अपहरण करून शालेय मुलीचे लग्न लावले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

नगर : बाबुर्डी बेंद (ता. नगर) येथील अल्पवयीन शालेय मुलीला चौघांनी घरातून पळविले. गावाजवळील एका मंदिरात नेऊन तिचे एकाबरोबर जबरदस्तीने लग्न लावले. मंदिरात मुलीला सोडून ते निघून गेले. मोबाईलवर त्यांनी या लग्नाचे चित्रीकरणही केले आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी बाबुर्डी बेंद येथील सरपंचासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

बाबुर्डी बेंदच्या सरपंचासह चौघांविरुद्ध गुन्हा

सरपंच दीपक भीमा साळवे, दत्तात्रेय पोपट चोभे, शिवराज अशोक इंगळे, अतुल रोहिदास चोभे (रा. बाबुर्डी बेंद), अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादीत म्हटले आहे, की मुलीच्या नातेवाइकाच्या संत्र्यांच्या बागेला पाणी देण्यासाठी आरोपी दत्तात्रेय चोभे काही महिन्यांपूर्वी येत होता. त्याच काळात मुलीच्या वडिलांना अपघात झाला. त्यांना भेटण्याच्या निमित्ताने त्याचे मुलीच्या घरी येणे-जाणे वाढले होते. 
आरोपी दत्तात्रेय याने सहा नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन केला. तो मुलीने घेतला. त्याने तिला खंडोबा मंदिराकडे बोलाविले. मात्र, मुलीने त्यास नकार देत फोन ठेवून दिला.

मोबाईलवर विवाहाचे चित्रीकरण 

दुसऱ्या दिवशी मुलगी एकटीच घरी असताना, आरोपी दत्तात्रेय चोभे, शिवराज इंगळे दुचाकीवर तेथे आले. त्यांनी मुलीला बळजबरीने दुचाकीवर बसवून खंडोबा मंदिराकडे नेले. तेथे रोहिदास चोभे व सरपंच साळवे हेही आले होते. त्यांनी मुलीला बळजबरीने दत्तात्रेय चोभे याच्या गळ्यात हार घालण्यास भाग पाडले. आरोपीने तिला मंगळसूत्र बांधले. मोबाईलमध्ये याचे फोटो घेऊन अतुल चोभे याने चित्रीकरण केले. 

मंदिराबाहेर थांबून, कोणी येते का, हे आरोपी दीपक व शिवराज पाहत होते. मुलीबरोबर बळजबरीने लग्न लावल्यानंतर त्यांनी तिला तेथेच सोडून दिले. लग्नाबाबत कोणाला काही सांगितल्यास कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

सरपंचाच्या सहभागाने खळबळ 
अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन जबरदस्तीने तिचे लग्न लावून देण्यात थेट गावाच्या सरपंचाचाच सहभाग असल्याने नगर तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. या प्रकाराची उलटसुलट चर्चा सुरू आहे. 

लवकरच आरोपींना अटक

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संवेदनशील गुन्हा असल्याने लगेच तपास सुरू केला. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल. 
- अजित पाटील, पोलिस उपअधीक्षक 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The accused fled the schoolgirl and got married