सांगलीतील कोणते अधिकारी राहिले गाफिल? तीन दिवसात होणार कारवाई!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

सांगली शहरासह कृष्णा-वारणा नदीकाठावरील जिल्ह्यातील 117 गावांना जोराचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गाफील अधिकाऱ्यांच्या यादीत सुमारे अर्धा डझन अधिकारी चौकशीच्या भोवऱ्यात आहेत. 

सांगली : ''सांगली जिल्ह्यातील महापूरस्थिती हाताळण्यात गाफील अधिकाऱ्यांवर येत्या तीन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कारवाई निश्‍चित होईल,'' अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज (सोमवार) येथे पत्रकारांशी बोलताना दिली. 

मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी (ता. 10) सांगलीतील पुरपरस्थितीची पाहणी व आढावा बैठकीसाठी आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर त्यांनी महापूरात जिल्ह्यात गाफील राहिलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे स्पष्ट संकेत दिले होते. मुख्यमंत्र्यांनी कारवाईची घोषणेनंतर तीन दिवसाचा कालावधी संपला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः प्रशासकीय हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत माहिती घेतल्याचे समजते. या शिवाय त्यांनी मागवलेला चौकशी अहवालही दोन दिवसात अपेक्षित आहे. महापूर स्थितीत सुधारणा झाल्यानंतर गाफील अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की त्यापूर्वी होणार याकडे सर्वाचे लक्ष आहे. 

सांगली शहरासह कृष्णा-वारणा नदीकाठावरील जिल्ह्यातील 117 गावांना जोराचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गाफील अधिकाऱ्यांच्या यादीत सुमारे अर्धा डझन अधिकारी चौकशीच्या भोवऱ्यात आहेत. 

याबाबत जलसंपदा मंत्री महाजन यांना विचारले असता ते म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनीच त्यांच्या दौऱ्यात महापूर परस्थिती हाताळण्यात गाफील असणाऱ्यांवर कारवाईचे स्पष्ट संकेत दिले आहेत. सबंधित अधिकाऱ्यांवर तीन दिवसात कारवाई निश्‍चित होईल.'' 

जिल्ह्यातील पूर परस्थितीबाबत जादा पाऊस आणि धरणातील विसर्गाच्या कारणांसह जिल्हा प्रशासनाकडून काहीच आवाहन केले नाही, याबाबत ते म्हणाले, "गेल्या काही वर्षातील सर्वाधिक पाऊस पडला. मात्र, त्याचवेळी सर्व प्रशासनाने एकाचवेळी प्रयत्न करण्याची गरज आहे.'' 

पूराचे पाणी दुष्काळी भागाला देण्याचा प्रयत्न 
जलसंपदा मंत्री महाजन दुष्काळी भागाला पूराचे पाणी देण्याबाबत विाचरले असता ते म्हणाले, "सध्या पंप पाण्यात आहेत. शिवाय आम्ही पाणी योजनांसाठी सर्वाधिक निधी दिला आहे. पुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्याबाबत आमचा विचार सुरु आहे. राज्यातील नद्याजोडसाठी 60 हजार कोटी खर्चाबाबतही आम्ही गांर्भीयाने विचार करीत आहे.''

सोशल मीडियावर विश्‍वास ठेवू नका... 
सांगलीत महापूर स्थितीत असलेल्या मंत्र्यांनी एका रात्रीत टीव्ही व अन्य गोष्टींसाठी 1.80 लाख खर्च केल्याच्या पोस्टबाबत महाजन यांना विचारले असता ते म्हणाले, "मी शासकीय विश्रामगृहातच रहावयास आहे. मी कार्यकर्त्याच्या घरी जेवण घेतो आहे. यामुळे खर्चाबाबत सोशल मीडियावरील माहितीला महत्त्व देऊ नका.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action in three days on officers of Sangli who careless about their work