सराईत गुन्हेगार अजय कांबळे टोळीला "मोका' 

शैलेश पेटकर
Wednesday, 25 November 2020

पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अजय बापू कांबळे (वय 23, राजीव गांधीनगर झोपडपट्टी, जुना बुधगाव रस्ता, सांगली) याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमानुसार (मोका) कारवाई करण्यात आली.

सांगली ः पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अजय बापू कांबळे (वय 23, राजीव गांधीनगर झोपडपट्टी, जुना बुधगाव रस्ता, सांगली) याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमानुसार (मोका) कारवाई करण्यात आली.

कांबळेसह सोहेल सलीम अंकलगी (19, वाल्मीकी आवास), अरबाज महंमदहनिफ माजगावकर (19, वाल्मीकी आवास), रमजान आयुब शेख (19, दत्तनगर), स्वप्नील उर्फ बाबा राजू रणदिवे (19, रा. वाल्मीकी आवास, सांगली) यांचा त्यात समावेश आहे. टोळीविरोधात खुनी हल्ला, जबरी चोरी, दरोड्यासह गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. 

अधिक माहिती अशी, की अजय कांबळे सराईत गुन्हेगार असून त्याने दहशतीसाठी टोळी तयार केली होती. सन 2015 पासून टोळीने सांगलीसह परिसरात गुन्हे केले आहेत. स्वतःचे वर्चस्व टिकवण्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी टोळीने दहशत निर्माण केली. खुनी हल्ल्यासह जबरी चोरी, दरोडा, चोरी, घरफोडी असे गंभीर गुन्हे टोळीवर दाखल आहेत. टोळीने तीन महिन्यांपूर्वी घरफोडी, जबरी चोरीसह तब्बल 14 गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार राकेश पंडित पुजारी (वय 23, वाल्मीकी आवास घरकुल) याच्यावर तलवारीसह धारदार शस्त्राने खुनी हल्ला केला होता. चोरीच्या सोन्याची वाटणी आणि पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला. त्यानंतर कांबळे पसार होता. 

नुकतेच त्याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. टोळीची वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस अधीक्षक गेडाम यांनी मोकाअंतर्गत प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी प्रस्ताव सादर केला.

कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांनी तातडीने मंजुरी दिली. त्यानुसार आज कारवाई करण्यात आली. कारवाईत अपर अधीक्षक मनीषा दुबुले, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहायक निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक अभिजित सावंत, सिद्धाप्पा रूपनर, शशिकांत जाधव, दीपक गट्टे यांचा सहभाग होता. 

चार जिल्ह्यांत गुन्हे दाखल 
अजय कांबळे टोळीविरोधात चार जिल्ह्यांत गुन्हे दाखल आहेत. सांगली शहर, मिरज शहर, संजयनगर, विटा, विश्रामबाग, तासगाव, कुपवाड पोलिस ठाण्यांसह पंढरपूर शहर, रत्नागिरी शहर, वडगाव (कोल्हापूर) पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याने संघटित टोळ्या निर्माण केल्या आहेत. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action Under MOKA against criminal Ajay Kamble gang