कार्यकर्ते उपेक्षित... हेच राष्ट्रवादीचं दुखणं 

उमेश बांबरे
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

सध्या पक्षाच्या ढासळणाऱ्या बुरूजांची पुनर्बांधणी करतानाच कमी वेळेत सक्षम तरुण नेतृत्व उभे करून भाजपचे आव्हान मोडून काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना झटावे लागणार आहे. 

सातारा : घराणेशाहीच्या राजकारणाला जिल्ह्यात राष्ट्रवादीने कायम बळ दिले. आज हीच घरंदाज मंडळी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जाऊ लागली आहेत. यातून अभेद्य बालेकिल्ल्याचे बुरूज ढासळू लागले आहेत. आमदारांनंतर दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते हे कायम स्थानिक पातळीवरच कार्यरत राहिले. हे कार्यकर्ते पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त जिल्हा परिषदेतील पदापर्यंत गेले. केवळ शरद पवारांवर विश्‍वास ठेऊन आजही ही मंडळी पक्षासोबत असूनही उपेक्षितच आहेत. सध्या पक्षाच्या ढसळणाऱ्या बुरूजांची पुनर्बांधणी करतानाच कमी वेळेत सक्षम तरुण नेतृत्व उभे करून भाजपचे आव्हान मोडून काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना झटावे लागणार आहे. 
1999 पासून जिल्ह्यात बाळसे धरलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. माजी आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपले काय चुकले, याचे गणितही मांडणे अवघड झाले आहे. सध्या सर्वांना भाजप आणि शिवसेनेकडून ऑफर येत आहेत. अशातच उद्या (बुधवारी) त्यांची शिवस्वराज्य यात्रा जिल्ह्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर गेल्या 20 वर्षांत भरारी घेणाऱ्या पक्षाची बालेकिल्ल्यातच पडझड होण्यामागची कारणे शोधणे तितकेच महत्त्वाचे आहे. एरवी भाकरी करपू नये म्हणून ती फिरवायची, हा साधा नियम आहे. सातारा जिल्हा राष्ट्रवादीत तेच झालेले नाही. त्यातून निर्माण झालेल्या नाराजीतून पक्षाचा एक एक शिलेदार भाजपच्या वाटेवर जाऊ लागला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठोपाठ खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे दिग्गज नेते भाजपमध्ये जाण्यास तयार झाले असल्याची चर्चा आहे. मुळात जिल्ह्याचे राजकारण हे राजघराण्यांच्या भोवतीच फिरत आले आहे. त्यावर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आजपर्यंत तरला आहे. या व्यतिरिक्त आमदार शशिकांत शिंदे वगळता उर्वरित आमदार हे एक तर राजघराण्याशी किंवा राजकीय वारसा असणाऱ्या घराण्याशी जोडलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात फलटण आणि कोरेगावचा आमदार वगळता उर्वरित ठिकाणी घराणेशाहीचेच राजकारण राष्ट्रवादीत राहिले. त्यामुळे आमदारांच्या नंतरच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते हे कायम स्थानिक नेतेच राहिले. या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम गेल्या 20 वर्षांत झालेच नाही. हे कार्यकर्ते पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त जिल्हा परिषदेच्या सभापतिपदापर्यंत गेले. त्यांच्याकडे पाहायला ना पक्षाला, ना नेत्यांना आजपर्यंत वेळ मिळाला. राजघराण्यातील नेत्यांतील वादातूनच जिल्ह्यातील राष्ट्रवादीपुढे आव्हान उभे राहिल्याचे दिसते. सातारा पालिकेच्या निवडणुकीनंतर राजघराण्यातील राजकीय वादाला सुरवात झाली. उदयनराजेंना लोकसभेसाठी पक्षातूनच विरोध असताना शरद पवारांनी सर्वांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करीत त्यांनाच तिकीट दिले. त्यानंतर तिसऱ्यांदा झालेल्या लोकसभेच्या निवडुणकीतही पक्षातील आमदारांनी थेट विरोध करूनही उदयनराजेंचीच पाठराखण करीत शरद पवारांनी त्यांना तिसऱ्यांदा खासदार केले. यासाठी पक्षाचे सर्व आमदार झटले; पण पक्षाला आपली कदर नाही, त्यामुळे आपण सत्तेसोबत गेल्यास निदान विकासकामे तरी होतील, या भावनेतून शिवेंद्रसिंहराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीला खिंडार पडले. आता त्यांच्यापाठोपाठ सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि खुद्द खासदार उदयनराजे भोसले यांच्याही भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची पडझड होत असताना येणारी ही यात्रा कार्यकर्त्यांतील अस्वस्थता दूर करेलही; पण ढासळत चाललेल्या बुरूजांची पुनर्बांधणी करणे सोपे नाही. त्यासाठी कमी वेळेत सक्षम तरुण कार्यकर्त्यांना ताकद देऊन भाजपचे आव्हान मोडून काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना झटावे लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Activists neglected ... This is the nationalist's hurt BJP will have to fight to break the alleged challenge