आदित्य ठाकरे यांना शिरोळ मतदारसंघातून उमेदवारीचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

जयसिंगपूर - ‘‘युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना शिरोळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या; माझ्यापेक्षाही दुप्पट मतांनी निवडून आणू,’’ असा शब्द शिरोळचे आमदार उल्हास पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला. कोल्हापूर दौऱ्यावेळी अंबाबाईच्या साक्षीने आमदार पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी आमदारकी पणाला लावण्याचा निर्धार बोलून दाखविला. 

आदित्य ठाकरे प्रथमच विधानसभेत जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे एक सुरक्षित मतदारसंघ म्हणून आमदार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यापुढे हा प्रस्ताव ठेवला. दरम्यान, ठाकरे यांनी योग्य वेळी निर्णय घेऊ, असे सांगितले. शिरोळ तालुक्‍याच्या इतिहासात प्रथमच उल्हास पाटील यांच्या रूपाने विधानसभेवर भगवा फडकला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जिल्हा उपाध्यक्षपदावर कार्यरत असणाऱ्या पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी संघटनेला सोडचिठ्ठी देऊन ऐन वेळी भगवा खांद्यावर घेतला. 

दत्त साखर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष स्व. डॉ. सा. रे. पाटील, शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, स्वाभिमानीचे उमेदवार सावकर मादनाईक यांना नाकारून मतदारांच्या पाठिंब्यामुळे आमदारकीचा मुकुट उल्हास पाटील यांनी घातला. 

शिरोळ हा शिवसेनेचा सुरक्षित मतदारसंघ आहे. आदित्य ठाकरे यांना शिरोळमधून उमेदवारी दिल्यास त्यांना उच्चांकी मतांनी निवडून आणू.
- आमदार उल्हास पाटील

गतवर्षी दिवसभर शिरोळ तालुक्‍याच्या दौऱ्यावर असताना आमदार पाटील यांना मंत्री करा अशा भावना मतदारांनी व्यक्त केल्यानंतर उल्हास पाटील हे माझे चांगले मित्र आहेत आणि ते माझ्यासाठी मंत्र्यापेक्षाही मोठे असल्याची भावनाही ठाकरे यांनी व्यक्त केली होती. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray proposed a nomination from Shirol constituency