युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे जल्लोषी स्वागत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

कोल्हापूर - शिवसेना नेते व युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे कोल्हापूर दौऱ्यावर सकाळी आगमन झाले. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ठाकरे यांच्या या दौऱ्याला महत्व आले आहे. दोन दिवस दौऱ्यावर असलेले ठाकरे हे कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदार संघात विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत.

कोल्हापूर - शिवसेना नेते व युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे कोल्हापूर दौऱ्यावर सकाळी आगमन झाले. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ठाकरे यांच्या या दौऱ्याला महत्व आले आहे. दोन दिवस दौऱ्यावर असलेले ठाकरे हे कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदार संघात विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. त्याचबरोबर आगामी विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना प्रोत्साहन देण्याचे कामही या दौऱ्यात होणार आहे. 

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे मंगळवारी सकाळी विमानाने मुंबईहून बेळगाव विमानतळावर दाखल झाले. तिथे बेळगावसह कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले. यानंतर मोटर रॅलीनेच ते चंदगड तालुक्‍यातील शिनोळी येथे दाखल झाले. शिवसेना आणि चंदगडकरांचा घनिष्ठ संबंध आहे. तालुक्‍यातील बहुतांश कुटुंबातील व्यक्‍ती या मुंबईत नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झाल्या आहेत. त्यामुळे सेनेचा आणि चंदगडचा घनिष्ठ संबंध आहे. सेनेचे आणि चंदगडकरांचे भावनिक नाते असल्याने ठाकरे यांच्या दौऱ्यात उत्साह पहायला मिळत आहे. 

ठाकरे हे कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार आहेत. त्याचबरोबर ते आजरा-चंदगड, कागल, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी-पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ या विधानसभा मतदार संघातही जाणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. युवा सेनेच्या माध्यमातून यंग ब्रिगेड बांधण्याचे काम या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांच्याकडून होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला महत्व आले आहे. 

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा.संजय मंडलिक यांची उमेदवारी अंतीम मानली जात आहे. तर हातकणंगले लोकसभा मतदार संघातून सध्या शिवसेनेत दाखल झालेले धैर्यशील माने यांची उमेदवारी सेनेने घोषित केली आहे. मंगळवारी दुपारनंतर काही काळ ठाकरे हे माने यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. यावेळी ते हातकणंगले लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

Web Title: Aditya Thakare on Kolhapur Tour