आमदार रोहित यांच्या कार्यपद्धतीवर प्रशासन खूष

The administration is pleased with the work of MLA Rohit
The administration is pleased with the work of MLA Rohit
कर्जत : एरवी आढावा बैठक म्हणजे निव्वळ झापाझापी. काही अधिकारी तर बैठक म्हटलं, की रजा टाकून काढता पाय घेतात. कर्जतला मात्र उलटं घडलं. आमदार रोहित पवार यांनी घेतलेली आढावा बैठक एक-दोन नव्हे, तर तब्बल नऊ तास चालली. दहा वाजता सुरू झालेली बैठक सायंकाळी सात वाजता संपली. मात्र, अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर त्राग्याऐवजी आनंदच ओसंडून वाहत होता. ते सर्वच आमदार पवार यांच्या कार्यपद्धतीवर खूष असल्याचे दिसत होते. प्रशासनाला विश्‍वासात घेऊन तालुक्‍याचा विकास करण्याची पवार यांची संकल्पना त्यांना भावली.

तालुक्‍यात केलेले पंचनामे गावातील दर्शनी भागात लावावेत. महसूल मंडलनिहाय आढावा बैठक महिन्याला घेतली जाईल, तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी दर महिन्याला जनता दरबार घेतला जाईल, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

कर्जत येथे पंचायत समिती, कृषी, आरोग्य, महसूल, वन, वीज वितरण, पाणीपुरवठा, बांधकाम विभाग, पोलिस यांसह विविध विभागांतील अधिकारी- कर्मचाऱ्यांची आढावा बैठक झाली. प्रत्येक विभागाला त्यांनी ठरावीक वेळ दिली होती. त्या वेळेतच ती बैठक होत होती. एरवी अधिकाऱ्यांना तासन्‌ तास ताटकळत थांबावे लागत असे. आमदार पवार यांनी बैठकीचे योग्य व्यवस्थापन केले. बैठकीतून बाहेर पडल्यानंतर अधिकारी-कर्मचारी आनंदित होते.

भाजपचे नेते राम शिंदे यांचा धक्कादायक पराभव करुन रोहित पवार निवडून आले. तेव्हाच त्यांनी सर्वांना सोबत व विश्‍वासात घेऊन काम करण्याची ग्वाही दिली होती. तसेच निवडून आले, त्याच दिवशी आमदार रोहित पवार यांनी थेट चौंडी (ता. जामखेड) येथे राम शिंदे यांच्या मातु:श्रींचे दर्शन घेऊन राजकीय तणाव देखील काढून टाकण्यास प्रारंभ केला होता. त्यामुळे पवार काम कसे करतात, याकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते.

आमदार पवार म्हणाले, ""मतदारसंघात लोकांच्या उंचावलेल्या अपेक्षा आणि वाढलेली जबाबदारी याची जाणीव आहे. अनेक कार्यालयांमध्ये रिक्त जागा असल्याने "प्रभारी राज' सुरू आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका ठेवावी.''

बैठक खेळीमेळीच्या वातावरणात
आढावा बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झाली. सर्वांना हातात हात घालून काम करायचे आहे. चांगले काम करणाऱ्याचे कौतुक करण्यात येईल. मात्र, कामात हयगय आणि दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करू, अशी तंबीही आमदार पवार यांनी दिली.

लाभार्थ्यांसाठी अधिकाऱ्यांनी खबरदार घ्यावी
केंद्र व राज्य सरकारच्या सार्वजनिक व वैयक्तिक योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, तसेच पात्र लाभार्थीला त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळावा याची अधिकाऱ्यांनी खबरदार घ्यावी. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या समन्वयातून विकासपर्व साधू.
- रोहित पवार, आमदार, कर्जत जामखेड
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com