शिर्डी विमानतळ तिसऱ्या दिवशीही बंदच 

सतीश वैजापूरकर 
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

देशभरातील विविध महानगरांतून दररोज सुमारे अडीच हजार प्रवाशांना घेऊन चौदा विमाने येतात आणि जातात. केवळ विमान तिकिटापोटी दररोजचे एक कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. प्रवाशांना साई मंदिरापर्यंत ने-आण करण्याचा व्यवसाय करणारी सुमारी शंभर खासगी वाहने गेल्या तीन दिवसांपासून उभी आहेत.

शिर्डी : राज्यातील सर्व विमानतळांवरील हवाई सेवा व्यवस्थित सुरू असताना गेल्या तीन दिवसांपासून (गुरुवार, ता. 7 पासून) शिर्डी विमानतळ मात्र बंद आहे. कमी दृश्‍यमानता असताना विमानसेवा सुरू ठेवण्यासाठी आवश्‍यक असलेली यंत्रणा येथे वेळेत कार्यान्वित न केल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. येथे देशभरातील विविध महानगरांतून दररोज सुमारे अडीच हजार प्रवाशांना घेऊन चौदा विमाने येतात आणि जातात. केवळ विमान तिकिटापोटी दररोजचे एक कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. प्रवाशांना साई मंदिरापर्यंत ने-आण करण्याचा व्यवसाय करणारी सुमारी शंभर खासगी वाहने गेल्या तीन दिवसांपासून उभी आहेत. विमानतळावरील अधिकारी व कर्मचारी प्रवाशांना कोणताही खुलासा न देता बसून आहेत. 

महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने उभारलेले हे राज्यातील एकमेव विमानतळ आहे. कमी दृश्‍यमानता असताना विमानसेवा सुरू ठेवण्यासाठी आवश्‍यक असलेली यंत्रणा न उभारताच अर्धवट अवस्थेत हे विमानतळ सुरू करण्यात आले. विमानसेवा सुरू होऊन दोन वर्षे उलटली, तरीही ही यंत्रणा कार्यान्वित झाली नाही. खरे तर सहा महिन्यांत ही यंत्रणा कार्यान्वित होणे आवश्‍यक होते. हवामान थोडे जरी ढगाळ झाले, तरी या यंत्रणेअभावी कमी दृश्‍यमानतेमुळे विमानसेवा बंद ठेवावी लागते. 

अचानक विमानसेवा बंद ठेवावी लागल्याने, पहिल्या दिवशी गुरुवारी विमान कंपन्यांना तिकिटांची सुमारे एक कोटी रुपयांची रक्कम प्रवाशांना परत करावी लागली. तेवढ्याच किमतीचे इंधन व व्यवस्थापन खर्च सोसावा लागला. पहिले दोन दिवस, नेमके काय चालले, याची कल्पना प्रवाशांना नव्हती. ते विमानतळावर पोचले. विमान रद्द झाल्याचे समजताच चिडले. त्यांची समजूत घालताना विमान कंपन्यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले. प्रवाशांना औरंगाबाद किंवा पुणे येथून पुढील विमानप्रवास करता यावा यासाठी तिकिटे बदलून द्यायला वेळ लागला. प्रवाशांचा संयम सुटला की वाद सुरू व्हायचा. लहान मुले व वृद्ध प्रवाशांचे हाल झाले. प्रवाशांनाही भुर्दंड सोसावा लागला. 
 
कासवगतीने काम 
कमी दृश्‍यमानता असतानाही विमानसेवा सुरू ठेवण्यासाठी "डॉपलर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ओमनी रेंज' ही यंत्रणा आवश्‍यक असते. ती येथे आहे; मात्र ती कार्यान्वित करण्याचे काम गेल्या वर्षभरापासून कासवगतीने सुरू आहे. हे काम करणाऱ्या ठेकेदाराने दर्जा व कामाची गती न सांभाळल्याने त्याला बदलण्यात आले. त्यात वर्षभराचा कालावधी वाया गेला. आता नव्याने एका ठेकेदाराला उर्वरित काम देण्यात आले. सुमारे पाच किलोमीटरवरून विमानतळावरील धावपट्टीचे निरीक्षण वैमानिकाला करता यायला हवे. त्यासाठी ही यंत्रणा आवश्‍यक असते किंवा हवामान स्वच्छ असावे लागते. सध्याची दृश्‍यमानता साडेतीन किलोमीटरपेक्षाही कमी आहे. त्यामुळे विमानसेवा बंद ठेवण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. 
 
"एअर ट्रॉफिक कंट्रोल' कामचलाऊ 
येथील एअर ट्रॉफिक कंट्रोल यंत्रणादेखील कामचलाऊ स्वरूपाची आहे. या विभागात पुढील हवामानाचा बऱ्यापैकी अचूक अंदाज देऊ शकणारी यंत्रसामग्री व एका तज्ज्ञाचा समावेश असतो. मात्र, येथील यंत्रणा कामचलाऊ आहे. पुढील दोन-तीन दिवसांत येथील दृश्‍यमानता (व्हिजिबिलिटी) कशी व किती असेल याचा अंदाज व्यक्त करण्याची क्षमता नाही. हा अंदाज नसल्याने विमानसेवा सुरू करायची की नाही याबाबत कंपन्या निर्णय घेऊ शकत नाही, असा गोंधळ या विमानतळावर सध्या सुरू आहे. 

शिर्डीतील विमानसेवा 
ठिकाण - आगमन - उड्डाण 
स्पाइस जेट 
दिल्ली - स. 10.30 - स. 11.05 
हैदराबाद - स. 11.00 - स. 11.20 
बंगलोर - दु. 12.00 - दु. 12.20 
हैदराबाद - दु. 02.40 - दु. 03.00 
चेन्नई - दु. 02.40- दु. 03.10 
बंगलोर - दु. 04.00 - दु. 4.40 
चेन्नई - दु. 04.25 - दु. 04.45 
चेन्नई- दु. 4.40 - सायं. 05.10 
हैदराबाद - सायं. 5.20 - सायं. 5.50 

इंडिगो 
हैदराबाद - स. 09.00 - स. 09.20 
इंदूर - दु. 12.10 - दु. 12.30 
हैदराबाद - दु. 01.30 - दु. 01.50 
बंगलोर - दु. 04.00 - दु. 04.20 

एअर इंडिया 
मुंबई - दु. 04.10 - दु. 04.25 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After third day also Shirdi Airport closed