सहाय्यक पोलिस अधिक्षक डॉ. रोहन यांची बदली रद्द करण्यासाठी इचलकरंजीत रास्ता रोको

सहाय्यक पोलिस अधिक्षक डॉ. रोहन यांची बदली रद्द करण्यासाठी इचलकरंजीत रास्ता रोको

इचलकरंजी - अवैध व्यवसायांचा कर्दनकाळ ठरलेल्या सहाय्यक पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ती रद्द करावी, या मागणीसाठी बुधवारी इचलकरंजीत कॉ. मलाबादे चौकात जोरदार निदर्शने करत रास्ता रोको करण्यात आला. विधानसभा युवक काँग्रेस व इचलकरंजी विधानसभा एनएसयुआय संघटना यांच्यावतीने ही निदर्शने करण्यात आली. सुमारे अर्धातास सुरु असलेल्या आंदोलनामुळे चोहोबाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती.

महिन्याभरापूर्वी पदभार स्विकारलेल्या सहाय्यक पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांची तडकाफडकी बदली केली आहे. पदभार स्विकारल्यापासून निलाभ रोहन यांनी अवैध व्यवसायाच्या विरोधात कारवाईचा धडका सुरु केला होता. एैन दिवाळीत त्यांनी जुगार क्लबच्या विरोधात केलेल्या कारवायांमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. मात्र मंगळवारी अचानकपणे या कर्तव्यदक्ष अधिकार्‍याची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

डॉ. निलाभ रोहन यांची बदली रद्द करावी अशी मागणी करत इचलकरंजी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष पै. अमृत भोसले, एनएसयुआय अध्यक्ष नितीन पडीयार, नगरसेवक राजू बोंद्रे यांच्या नेतृत्त्वाखाली कॉ. मलाबादे चौकात जमलेल्या युवा कार्यकर्त्यांनी चोहोबाजूंचे रस्ते अडवून धरत रास्तारोको आंदोलन सुरु केले. जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण चौक दणाणून सोडला.

यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे यांना निवेदन सादर केले. तर आंदोलनकर्त्यांनी निलाभ रोहन यांना खांद्यावर उचलून घेत त्यांच्या कार्याला सलाम करत बदली रद्द झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. 

अप्पर पोलिस अधिक्षक घाडगे यांच्याशी चर्चा करताना पै. अमृत भोसले, राजू बोंद्रे, नितीन पडीयार यांनी, सहाय्यक पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी जुगार क्लबच्या विरोधात केलेल्या कारवाईमुळे इचलकरंजीत पहिल्यांदाच सर्वसामान्यांच्या घरात आनंददायी दिवाळी साजरी झाली. त्याचबरोबर मटका, जुगार, ओपन बार, ऑनलाईन लॉटरी यासह विविध अवैध व्यवसायाला डॉ. रोहन यांनी चांगलाच चाप लावला आहे. इतकी चांगली कामगिरी केली असतानाही त्यांची तडकाफडकी बदली झाल्याने संपूर्ण शहर एका चांगल्या अधिकार्‍याला गमावणार आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी व अवैध व्यवसायांना लगाम घालण्यासाठी धडाकेबाज अधिकार्‍यांची गरज असल्याने त्यांची बदली रद्द करावी अशी मागणी केली. 

या आंदोलनात अनिस म्हालदार, मयुर इंगवले, भारत बोंगार्डे, राजू आवळे, सुभाष मालपाणी, सुशांत खोत, शाहरुख कलावंत, वृषभ हेरलगे, निखिल जमाले, अलिशा आवळे, विकी आवळे, योगेश हेरलगे आदींसह युवक काँग्रेस व एनएसयुआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com