कृषी कन्या : बियाणे खरेदी ते शेतमाल विक्री

वाहन चालवणे, शेतीचीही जबाबदारी
 दीपाली राजेंद्र चव्हाण
दीपाली राजेंद्र चव्हाणsakal

विटा : ध्येयाने प्रेरित झालेली महिला काय करू शकते, याचा आदर्श निर्माण करणाऱ्या अष्टपैलू महिला सौ. दीपाली राजेंद्र चव्हाण (रा. चिखलहोळ ता. खानापूर). त्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, रोटर अशी वाहने चालवतात.‘जिथे कमी तिथे मी’ या तत्त्वाने शेतातली सोपी व अवघड, लहान-मोठी सगळी कामे त्या लीलया करतात.

रेठरे कारखाना (ता. कऱ्हाड) येथील सौ. शशिकला व तानाजी रामचंद्र पवार यांची लेक असणाऱ्या दीपाली यांचे शिक्षण फक्त दहावीपर्यंतचे. आई-वडिलांकडे शेती करण्याची संधी मिळाली नाही. लग्न होऊन चिखलहोळच्या राजेंद्र चव्हाण यांच्याशी संसार करता-करता शेतीची आवड निर्माण झाली. पूर्वी द्राक्षबाग होती, मात्र पाण्याअभावी काढावी लागली. ढबू, मिरची, दोडका पिके घेण्यासाठी खूप मेहनत घेतली. टँकरने विकत घेऊन पाणी घातलेल्या ढब्बू मिरचीचे पीक आले आणि २००३-०४ मध्ये चांगले पैसे मिळाले, शेती फुलू लागली आणि दुष्काळातही उत्तम शेती करणारे कुटुंब म्हणून नावलौकिक झाला.

पती राजेंद्र एकटे असल्याने मेहनतीने शेती करण्याची जाणीव दीपाली यांना झाली. शोभा व शंकर या आई-वडिलांप्रमाणे असणाऱ्या सासू-सासऱ्यांची मायेची, प्रोत्साहनाची थाप त्यांच्या पाठीवर पडत राहिली. उत्तम शेती करण्यासाठी जे करावे लागेल ते करण्याची तयारी त्यांनी ठेवली. आठवीत असणाऱ्या आपल्या प्रीतम या मुलाकडून सायकल शिकली. त्यानंतर त्यांनी स्वतःच दुचाकी धाडसाने चालवली. चारचाकी गाड्याही त्या आत्मविश्वासाने स्वतः चालवू लागल्या. रोटरची कामेही करू लागल्या. ट्रॉलीतून शेतीचा माल, साहित्य व मजूरांची ने-आण सुद्धा त्या स्वतः करतात.

ढबू मिरची, दोडका चार-पाच वर्षे केले. वाशी मार्केटला माल पाठवला जायचा. लागण करण्यापासून पीक काढून ट्रान्सपोर्टने माल पाठवण्यापर्यंत सर्व कामे दीपाली स्वतः करतात. गेल्या काही वर्षांत शेतीत पाण्याची सोय झाली. मात्र त्यापूर्वी दुष्काळाशी दोन हात करावे लागत असे. सासरे शंकर चव्हाण यांनी चिखलहोळ परिसरात टेंभूच्या माध्यमातून पाणी योजनेच्या पाठपुराव्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचा दिवस पहाटेपासून सुरू होतो. पाच-सहा जनावरांचे व सर्व नित्यकाम उरकून लवकरात लवकर शेताकडे जाण्याची ओढ त्यांना असते. मुलगा प्रीतम बी.एस्सी. ॲग्री तृतीय वर्षात शिकतोय. नोकरी लागली, तरीही त्याला आदर्श शेतकरी बनवण्याचा संकल्प चव्हाण कुटुंबीयांनी केला आहे. सध्या बटाटा, पपई, ऊस ही पिके चव्हाण परिवाराच्या वीस एकरात साकारली आहेत. वेफर्स निर्मितीसाठी करार करून बटाटा कंपनीला दिला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com