भीमा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे शेती पाण्यात; दक्षिण मात्र भागात दुष्काल

हुकूम मुलाणी 
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

- भीमा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे शेती पाण्यात
- दक्षिण भागातील शेती दुष्काळामुळे वाया
- दुहेरी अडचणीत मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी

मंगळवेढा : तालुक्यामध्ये नदीकाठची शेती भीमा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे पाण्यात गेली आहे. तर दक्षिण भागातील शेती दुष्काळामुळे वाया गेली आहे, अशा दुहेरी अडचणीत तालुक्यातील शेतकरी सापडलेला आहे.

उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेली आणि नवीन लागण केलेली पिके पाण्यात घालवण्याची वेळ शेतकऱ्यांच्या नशिबात आली. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टी मुळे त्या भागातील धरणे पूर्ण भरून जादा झालेले पाणी त्या त्या नदितून सोडण्यात आले. त्यामुळे अगदी कमी दिवसात उजनी धरणाने शंभरी पार केली.

जादा झालेले पाणी भीमा नदीच्या पात्रातून आणि उजव्या कालव्यातून सोडण्यात आले. याशिवाय नीरा नदीतून पाणी सोडण्यात आल्यामुळे सध्या भीमा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. त्यामुळे तालुक्यात नदीकाठी असलेल्या उचेठाण बठाण, ब्रह्मपुरी, रहाटेवाडी, तामदर्डी, सिद्धापूर, अरळी या गावातील नदीकाठीच्या शेतीबरोबर कांदा, मका, कडवळ ही पिके पाण्यात गेली आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते आहे. दक्षिण भागात सुरू असलेल्या जनावरांच्या छावण्यांसाठी नदीकाठचा ऊस मोठ्या प्रमाणात कार्यासाठी वापरण्यात आला. नवीनच उगवत असलेला ऊस व कांदा पिकाचे सध्या पाणी असल्यामुळे ह्या पिकाचे पूर्णतया नुकसान झाले. अशा परिस्थितीमध्ये लावलेला कांदा पूर्ण पाण्यात गेल्यामुळे शेतकरी मात्र आर्थिक अडचणीत सापडलेला आहे

"कांद्याला मिळालेल्या चांगल्या दरामुळे सुधारित पद्धतीने कांदा केला परंतु भीमा नदीच्या पुराने माझा पूर्ण कांदा पाण्यात गेल्यामुळे मी अडचणीत आलो आहे."- शिवराज पाटील, सिध्दापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agricultural lost because water released in the Bhima River