महापुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान

Agriculture badly affected by flood in Shirol
Agriculture badly affected by flood in Shirol

खिद्रापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने घातलेल्या थैमानानंतर मनुष्य, जनावरे आणि मालमत्ता यांची मोठी हानी झाली. आता शेतीचे झालेले प्रचंड नुकसान समोर येत आहे. नजर जाईल तिथपर्यंत महापुरात उध्वस्त झालेली शेतजमीन, काही ठिकाणी पिकांचा फक्त बुडकाच उरलेला, केळी जमीनदोस्त झालेली, पाण्यात कुजून खराब झालेला भुईमूग अशी भयानक अवस्था शिरोळ तालुक्यातील शेतीची आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतीवर अवलंबून असणारी अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत.

शिरोळ तालुक्यातील बहुतांश गावातील शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. राजापूर गावातील 100 टक्के शेती पाण्याखाली गेली आहे. केळीसाठी तालुक्यातील प्रति जळगाव असणार्‍या खिद्रापूर गावातील केळीचे पीक जमीनदोस्त झाले आहे. नुकतीच लागवड केलेली केळीची रोपे जमिनीवर झोपली आहेत. केळीच्या तयार झालेल्या उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे. या गावातील जवळपास 200 एकर क्षेत्रातील केळीचे नुकसान झाले आहे.

पंचगंगा, कृष्णेच्या काठावर असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस क्षेत्रातील सर्व शेतजमिनी उध्वस्त झाल्याचे चित्र तालुक्यात आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादनात तसेच संपूर्ण देशभरातील बाजारपेठेत भाजीपाल्याच्या उत्पादनात अग्रेसर म्हणून शिरोळ तालुक्याची ओळख आहे. दरवर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस, भुईमूग, सोयाबीन यांची लागवड करतात. पण, यंदा महापुराने शेतकर्‍यांना मोठ्या आर्थिक संकटात अडकविले आहे. महापुरात ऊस, भुईमूग, सोयाबीन ही पिके पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे शेतीत गुंतवलेले पैसे सर्व पुरात वाहून गेले आहे. शेती करण्यासाठी आता पैसा आणायचा कोठून, असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत. शासनाने जाहीर केलेली मदत लवकर मिळावी या आशेवरच शेतकरी अवलंबून आहेत.

अनेक गावात नुकतीच केलेली ऊसाची लागवड, भुईमुगाच्या शेंगा, कापणीसाठी काही काळ उरला असताना वाहून गेलेले सोयाबीन, टोमॅटो, कारली यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतजमिनीत पाणी साचून राहिले आहे. या परिस्थितीत शेतकर्‍यांना शासनाकडून येणार्‍या मदतीवर अवलंबून राहून शेतीची मशागत नव्याने करावी लागणार आहे.

केळीचे मोठे नुकसान
केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून लागवडीसाठी दिड लाखापर्यंत खर्च केला आहे. या उत्पादनातून मोठा फायदा मिळण्याचा विश्‍वासही या महापुरात वाहून गेला आहे. त्यामुळे पुन्हा शेतजमिनी तयार करून उत्पादन घेणे मोठे आव्हान आहे.
- ऋषभ सुंके, शेतकरी, खिद्रापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com