नगरचे शेतकरी म्हणाले... मुख्यमंत्रीसाहेब, अंगठा दाखवला की कर्जाला ठेंगा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केली. त्यावर दोघांनीही, "ही भावना म्हणजे सरकारला आशीर्वादच आहेत. शेतकऱ्यांनो, योजनेचा लाभ घ्या. आनंदी व सुखी राहा. असाच सरकारला आशीर्वाद कायम असू द्या,' असे सांगितले.

नगर ः "याआधीच्या काळात कर्जमाफी योजनेची प्रक्रिया अतिशय किचकट होती. सरकारी कार्यालयात हेलपाटे मारूनच जीव जात होता. साहेब, आता कर्जमाफी प्रक्रिया सहज सुलभ आहे. केवळ अंगठा टेकवला की काम फत्ते होत आहे,' अशी भावना राहुरी तालुक्‍यातील शेतकरी पोपटराव मोकाटे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केली. त्यावर दोघांनीही, "ही भावना म्हणजे सरकारला आशीर्वादच आहेत. शेतकऱ्यांनो, योजनेचा लाभ घ्या. आनंदी व सुखी राहा. असाच सरकारला आशीर्वाद कायम असू द्या,' असे सांगितले. 

मुख्यमंत्री म्हणाले, आशीर्वाद द्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (सोमवार) मुंबई येथून शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) संवाद साधला.

जाणून घ्या - ठाकरे सरकारविरोधात अण्णांनी थोपटले दंड

जिल्ह्यातील ब्राह्मणी (ता. राहुरी) व जखणगाव (ता. नगर) येथील शेतकऱ्यांना संवादाची संधी मिळाली. नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, तहसीलदार एफ. आर. शेख व उमेश पाटील उपस्थित होते. 

किती कर्ज होते, फिटले का

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणाला आज सुरवात झाली. प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांतील याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. राज्यात कर्जमुक्ती योजनेत आधार प्रमाणीकरणात जिल्ह्याला पहिला बहुमान मिळाला. सुरवातीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जिल्ह्यातील कोणत्या गावातून आलात, हे विचारले. त्यानंतर पोपटराव मोकाटे यांच्याशी आधी उपमुख्यमंत्री पवार यांनी संवाद साधला. किती कर्ज होते? कशासाठी घेतले? अशी विचारणा केली. त्यावर मोकाटे यांनी सरकार, प्रशासनाचे आभार मानले.

 आम्ही फक्त कर्तव्य केलं
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की आभार कसले! हे तर आमचे कर्तव्यच आहे. ब्राह्मणी येथील उषाबाई हापसे, मीराबाई हापसे, गणपत जाधव, पोपट मोकाटे, संतोष ठुबे, दिलीप तारडे, राजेंद्र बानकर, पंढरीनाथ बानकर, पोपट ठुबे, भास्कर ठुबे आदी शेतकरी उपस्थित होते. 
ब्राह्मणी व जखणगाव या दोन्ही गावांतही पहिल्या दिवशी 40 टक्के आधार प्रमाणीकरणाचे काम आज पूर्णही पूर्ण झाले.

शुक्रवारी दुसरी यादी

शुक्रवारी (ता. 28) शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बॅंका, तहसील कार्यालये, सोसायटी, ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. आहेर म्हणाले, ""28 तारखेला याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी जिल्हा बॅंकेच्या शाखांत 300 आणि आपले सरकार सेवा केंद्रात सुमारे दीड हजार बायोमेट्रिक मशिन उपलब्ध करण्यात आल्या आहेत.'' 

जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, ""राज्यात सर्वाधिक लाभार्थींची संख्या नगर जिल्ह्यात आहे. जिल्हा बॅंक व इतर राष्ट्रीयीकृत बॅंकांकडील कर्जखात्यांची एकूण संख्या तीन लाख 53 हजार 720 आहे. दोन लाख 58 हजार 787 शेतकऱ्यांना दोन हजार 296 कोटींचा लाभ होणार आहे.'' 
 
नगर जिल्ह्याला पहिला बहुमान 
ब्राह्मणी व जखणगाव या दोन्ही गावांत मिळून 972 शेतकऱ्यांची नावे असलेल्या याद्या प्रसिद्ध झाल्या. आधार प्रमाणीकरणामध्ये ब्राह्मणी येथील शेतकरी अशोक देशमुख हे या योजनेचे राज्यातील पहिले मानकरी ठरले. 
 
कर्जमुक्तीचा अंतिम टप्पा सुरू 
विभागीय आयुक्त माने म्हणाले, ""कर्जमुक्ती योजनेत आधार प्रमाणीकरणाचे काम लवकरच पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात दोन दिवसांत रक्कम जमा होण्यास सुरवात होईल. नाशिक विभागात शेतकऱ्यांची संख्या सात लाख 53 हजार 103 आहे. कर्जमुक्तीसाठी मिळणारी अपेक्षित रक्कम पाच हजार 600 कोटी रुपये असल्याचे त्यांनी सांगितले.''  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar farmers say Chief Minister, Debt free process is easy