अजिंक्‍यताऱ्याच्या तटबंदीला धोका!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

दोन ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार; दुसरे प्रवेशद्वार बंद होण्याची भीती 

सातारा - परकीय आक्रमणातही ‘अजिंक्‍य’ राहिलेल्या येथील अजिंक्‍यतारा किल्ल्याची तटबंदी सुमारे ४०० वर्षांत शेकडो उन्हाळे-पावसाळे खाऊन कमकुवत झाली आहे. या तटबंदीचा काही अंतर्गत भाग पडायला लागला आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर दुसऱ्या दरवाजाजवळ दोन ठिकाणी दरड कोसळून तटबंदीची मोठी हानी झाली आहे. 

दोन ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार; दुसरे प्रवेशद्वार बंद होण्याची भीती 

सातारा - परकीय आक्रमणातही ‘अजिंक्‍य’ राहिलेल्या येथील अजिंक्‍यतारा किल्ल्याची तटबंदी सुमारे ४०० वर्षांत शेकडो उन्हाळे-पावसाळे खाऊन कमकुवत झाली आहे. या तटबंदीचा काही अंतर्गत भाग पडायला लागला आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर दुसऱ्या दरवाजाजवळ दोन ठिकाणी दरड कोसळून तटबंदीची मोठी हानी झाली आहे. 

शिलाहार राजा भोज याने हा किल्ला बांधला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तव्यामुळे या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व वाढले. शिवरायांचे नातू व संभाजी महाराज यांचे चिरंजीव छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक याच किल्ल्यावर झाला. त्यांनीच नंतर सातारा शहर वसवून स्वराज्याची राजधानी किल्ल्यावरून खाली पायथ्याला आणली. शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची सातारा ही चौथी आणि अखेरची राजधानी! या राजधानीच्या किल्ल्यावर प्रशासकीय दुर्लक्ष व राजकीय उदासिनतेमुळे मोठे संकट कोसळले आहे. 

किल्ल्याच्या मुख्य महादरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर २०-२५ पायऱ्या चढून गेल्यावर उजव्या बाजूस आणखी एक दरवाजाची कमान लागते. या उजव्या बाजूच्या तटबंदीमधील दोन- तीन मोठे दगड सुटून पडल्यामुळे तटबंदीचा आधार नाहिसा झाला आहे. तटबंदीमधील या भगदाडामुळे त्याच्यावरील दगडांचा आधार निखळला असून, एक-दोन जोराच्या पावसात माती निघून तटबंदी कोसळण्याचा धोका आहे. या कमानीतून आत गेल्यावर पायऱ्या डावीकडे वळतात. या पायऱ्या चढताना पुन्हा उजव्या बाजूची अंतर्गत तटबंदीचे दगड ढासळले आहेत. हे दगड पायऱ्यांवर रस्त्यातच पडले आहेत. काही जागरूक नागरिकांनी या तटबंदीचे मानवी उपद्रवामुळे अधिक नुकसान होऊ नये म्हणून तेथे मोठे दगड मांडून ठेवले आहेत. जेणेकरून तटबंदीजवळ सहज कोणी जाणारा नाही. मात्र, या तटबंदीचा येणाऱ्या पावसाळ्यात कितपत निभाव लागतो, याबाबत शंका आहे. 

अजिंक्‍यतारा किल्ल्याच्या तटबंदीवर उगवलेल्या झाडा-झुडपांमुळे तटबंदीचे अधिक नुकसान होत आहे. वड-पिंपळाच्या झाडांनी दगडी तटबंदीतही चांगलीच मुळे धरली आहेत. अनेकदा लोकांनी ही झाडे तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या झाडांची मुळे तटबंदीच्या भेगांमध्ये खोलवर जाऊन रुजल्याने या प्रयत्नांना यश येत नाही. 

अजिंक्‍यतारा डागडुजीसाठी दहा कोटींची घोषणा विरली हवेत! 
आग्रा येथील लाल किल्ला तेथील प्रशासनाने सांभाळून ठेवला. विशेष म्हणजे या किल्ल्याच्या दारातील चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारूढ पुतळा बसविला आहे. आमच्याकडे मात्र, याच शिवरायांनी उभारलेले एकसे एक देखणे किल्ले असताना ते सांभाळण्याची मानसिकता प्रशासनात दिसत नाही! अजिंक्‍यतारा किल्ल्याच्या डागडुजीसाठी दहा कोटी रुपये देण्याची घोषणा करणाऱ्या महाआघाडीची सत्ता याच महाराष्ट्रात रसातळाला गेली. शिवरायांच्या नुसत्या स्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाकरिता जाहिरातबाजीवर काही कोट रुपये खर्च करणारे भाजप सरकार अजिंक्‍यतारा किल्ल्याच्या दुरुस्तीकरिता खर्चाची तजवीज करणार का, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: ajinkyatara wall danger