वाघाची झाली शेळी; सरकार शेतकरीविरोधी- अजितदादा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

25 रुपयांच्या पेट्रोलला 51 रुपये कर!
पवार म्हणाले, "सरकारचा सावळा गोंधळ चालू आहे. 25 रुपये पेट्रोलची किंमत आणि 51 रुपये टॅक्स घेतात, हे जुलमी सरकार आहे. यांचे अपयश झाकण्यासाठी यांचे निर्णय जनतेवर लादत आहेत. पिणाऱ्यांचा टॅक्स न पिणाऱ्यांकडून घायचा, असे हे दळभद्री सरकार आहे."

सांगली : आता निवडणूक झाल्या आहेत, त्यामुळे सत्ताधाऱ्यांना काही फरक पडत नाही. निवडणुकीच्या काळात ज्या घोषणा करतात, त्या निवडणुका झाल्यावर विसरून जातात. हे केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्याच्या विरोधात आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 

संघर्षयात्रेदरम्यान ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्याची मशाल घेऊन सरकारला धडा शिकवण्यासाठी ही संघर्ष यात्रा सुरू आहे. या संघर्ष यात्रेची सरकारला दखल घ्यावीच लागेल नाहीतर आम्ही शेतकऱ्यांसाठी टोकाची भूमिका आम्ही घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

अजित पवार म्हणाले, "उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे अशी डरकाळी फोडत होते पण आता त्या वाघाची भाजपवाल्यांनी पार शेळी करून टाकली. शिवसेनेला कधीतरीच शेतकरी आठवतात. एवढंच प्रेम असेल तर करा मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीची मागणी. देत नसतील तर राजीनामे द्या."

तूर, विजेचे काय?
शेतकऱ्याकडे जी शिल्लक तूर आहे, ती खरेदी करण्यासाठी सरकारने तारीख ठरवावी आणि 5 हजार 50 रुपयांप्रमाणे दर दिला पाहिजे. आता जी वीज दरवाढ केली आहे, ती चुकीची आहे. हे बेजबाबदार सरकार आहे. आम्ही वीजबिले माफ केली आहेत, पण हे का करू शकत नाहीत, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. 

विशेष अधिवेशन बोलावणार?
विशेष अधिवेशन बोलवायचे असेल तर शेतकऱ्यांना तात्काळ विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी ही करण्यात आली. अधिवेशन आम्ही बोलावतोय, यामध्ये शेतीपंपाला वीज मिळावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे या अशा अनेक मागण्यांसाठी अधिवेशन आम्ही बोलावणार आहे. 

कुणाच्याच काळामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ नयेत. तेथे आम्हाला राजकारण आणायचा नाही. कर्जमुक्ती द्या नाहीतर बाजूला होऊन राज्याला मुक्त करा. कारण शेतकरी वाचवायचा आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. 
 

Web Title: ajit pawar calls fadnavis govt anti-farmer