लोकसभेच्या ४० जागांचे वाटप पूर्ण - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

इचलकरंजी - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील ४० जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. उर्वरित आठ जागांबाबत बुधवारी (ता. १९) संयुक्त बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी येथे दिली. 

इचलकरंजी - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील ४० जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. उर्वरित आठ जागांबाबत बुधवारी (ता. १९) संयुक्त बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी येथे दिली. 

येथील बालाजी पतसंस्थेच्या कार्यक्रमाला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी मित्रपक्षांत जागावाटपाचे काम सुुरू आहे. आतापर्यंत ४० जागांबाबत निर्णय झाले आहेत. अधिवेशन आणि काँग्रेसच्या संघर्षयात्रेमुळे आठ जागांबाबत निर्णय घेणे अद्याप प्रलंबित आहे. बुधवारी (ता. १९) याबाबत पुन्हा बैठक होणार आहे. त्यामध्ये हा निर्णय होईल, असे श्री. पवार यांनी सांगितले.  पक्षातील स्थानिक गटबाजीबाबत विचारले असता, अजित पवार यांनी स्थानिक पातळीवर मतभेद असले, तरी सर्वजण शरद पवार यांचे नेतृत्व मानतात. अन्य राजकीय पक्षांतही स्थानिक पातळीवर मतभेद असल्याचे स्पष्टीकरण दिले. 

श्रीमती निवेदिता माने यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत बोलताना ते म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीने त्यांना महिला आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष केले. जिल्हा बॅंकेत अध्यक्ष केले. दोनवेळा खासदार केले. त्यामुळे पक्षाने देता येईल तेवढे त्यांना दिले आहे.’’

आरक्षणाबाबत सरकार साशंक 
मराठा आरक्षण टिकविण्याबाबत सरकारकडून वकिलांची फौज उभी करण्याचे वक्तव्य केले जात आहे. त्यामुळे हे आरक्षण टिकणार की नाही, याबाबत सरकार साशंक आहे काय, असे  श्री. पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, यंत्रमाग टिकण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत; पण सरकार ठोस निर्णय घेत नाही, ही शोकांतिका आहे.

Web Title: Ajit Pawar comment