स्वतःचे झाकण्यासाठीच पिचड भाजपमध्ये : पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

""काही लोकांनी ज्या चुका केल्या, त्या झाकण्यासाठी ते भाजपमध्ये गेले. पिचड स्वतःचे झाकण्यासाठीच भाजपमध्ये गेले,'' अशी टीका माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज येथे केली. सत्ता येऊ द्या, गायकरांनाही धडा शिकवू, असा इशाराही त्यांनी दिला.

अकोले (नगर) : ""काही लोकांनी ज्या चुका केल्या, त्या झाकण्यासाठी ते भाजपमध्ये गेले. पिचड स्वतःचे झाकण्यासाठीच भाजपमध्ये गेले,'' अशी टीका माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज येथे केली. सत्ता येऊ द्या, गायकरांनाही धडा शिकवू, असा इशाराही त्यांनी दिला.

भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे, सुनीता भांगरे, युवा नेते अमित भांगरे, विनोद हांडे, दिलीप भांगरे, पुष्पलता सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश मेळावा आज झाला. त्या वेळी पवार बोलत होते. भानुदास तिकांडे अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, घनश्‍याम शेलार, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत, अशोक भांगरे, शर्मिला येवले, रंगनाथ वाकचौरे, यमाजी लहामटे आदी व्यासपीठावर होते.

""आता तालुक्‍यात सर्व विरोधकांनी "एकास एक'चा घेतलेला निर्णय उत्तम असून, त्याला गालबोट लागू देऊ नका. फूट पाडण्याचा प्रयत्न होईल. अफवा पसरवतील. हलक्‍या कानाचे राहू नका. सावध राहा. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही,'' असा सल्ला पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

""मतदारांनो तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न होईल. डोळ्यात अश्रू आणून, "माझे वय झाले. एकदा वैभवला मंत्री झालेले पाहू द्या,' अशी हाक देतील. सर्व कार्यकर्ते जिवाचे रान करा. स्वतः उमेदवार म्हणून कामाला लागा. आपण तालुक्‍याच्या विकासासाठी निळवंडे, पिंपळगाव खांड, आंबीत, पाडोशी, बलठणसह अनेक धरणांच्या कामांसाठी तालुक्‍यात दिलेल्या योगदानाची पावती देण्याची वेळ तुमची आहे. मी बारामतीत उच्चांकी मतांनी निवडून येणारच आहे; मात्र अकोल्यात "राष्ट्रवादी'चा उमेदवार विजयी करा. मी 24 ऑक्‍टोबरला अकोल्यात गुलाल घ्यायला येईन,'' असे आवाहन पवार यांनी केले.

""ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी आहेत. कुणाचा आवाका किती आहे, हे मला माहीत आहे. तुम्ही चुकू नका. तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले अथवा तुमच्या केसाला धक्का लावला, तर घाबरू नका. अजित पवार तुमच्या पाठीशी भक्कम आहे,'' असा विश्‍वासही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

सुरेश खांडगे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संपत नाईकवाडी यांनी स्वागत केले. संदीप शेणकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

स्वतःची काळी बाजू दिसल्यानेच...
मधुकर पिचड यांच्यावर टीका करताना पवार म्हणाले, ""शरद पवार यांनी पिचड यांना अनेकदा कॅबिनेट मंत्रिपद, 1995मध्ये विरोधी पक्षनेतेपद, पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद दिले. तालुक्‍याच्या विकासासाठी अनेकदा नगर जिल्हा परिषदेत महत्त्वाची पदे दिली. जिल्हा परिषदेत या तालुक्‍यातून "राष्ट्रवादी'चे केवळ दोन सदस्य निवडून आले असतानाही महत्त्वाचे सभापतिपद तालुक्‍याला दिले. गेल्या चार वर्षांपासून जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद दिले. अगस्ती सहकारी साखर कारखान्याला वेळोवेळी मदत केली. तालुक्‍यातील पाटपाण्यासह अनेक प्रश्‍न सोडविले. सर्व सत्ता व पदे दिलेली असताना पिचड यांनी पवार यांना सोडण्याचे पाप केले. आज काळा चष्मा काढल्याने त्यांना भाजपचा विकास नाही, तर स्वतःची काळी बाजू दिसल्याने त्यांनी हे पाऊल उचलले. संस्था लोकहितासाठी चालवायच्या असतात. त्या लुबाडायच्या नसतात. तालुक्‍यात कारखाना, शिक्षण संस्थेची काय परिस्थिती आहे? माझ्या बारामती मतदारसंघात एकाही कारखान्याने शेतकऱ्यांना 3300 रुपयांपेक्षा कमी भाव दिला नाही. तुमच्या कारखान्याने किती भाव दिला?''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar criticizes Pichad