अख्खा महाराष्ट्र अस्वस्थ आहे : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 ऑक्टोबर 2016

सरकारमधील काही मंत्री जागा घेऊन खासगी बाजार समित्या काढू लागले आहेत. आताच्या बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या आहेत, त्यावर नियंत्रण आहे. खासगी समित्यांवर कोण नियंत्रण ठेवणार आणि शेतकऱ्यांना हमी भावाची खात्री कोण देणार?

अकलूज : युतीमधील मंत्री काहीही बोलत सुटले आहेत. शांततेच्या मार्गाने लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चे निघत आहेत. अख्खा महाराष्ट्र अस्वस्थ झाला आहे. मात्र, सरकार यावर गंभीर नाही. शरद पवारसाहेबांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि मार्ग काढण्याबाबत चर्चा केली. या सरकारने शिक्षण, सहकार, बाजार समित्या मोडीत काढण्याचा धंदा सुरू केला आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

माळशिरस तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळावा आज येथे पार पडला. या वेळी ते बोलत होते. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्याच्या मंचावर माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, पक्षाचे निरीक्षक प्रदीप गारटकर, आमदार हनुमंत डोळस, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, धैर्यशील मोहिते-पाटील, मदनसिंह मोहिते-पाटील, राजूबापू पाटील आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, सरकारमधील काही मंत्री जागा घेऊन खासगी बाजार समित्या काढू लागले आहेत. आताच्या बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या आहेत, त्यावर नियंत्रण आहे. खासगी समित्यांवर कोण नियंत्रण ठेवणार आणि शेतकऱ्यांना हमी भावाची खात्री कोण देणार, असा प्रश्‍न उपस्थित करून ते म्हणाले, भाजपमध्ये गुंडांना प्रवेश देण्याचे सत्र सुरू आहे. दाऊदचा हस्तक रियाज भाटीला कार्यकारिणीत स्थान दिले जातेय. महागाई कमी करू, काळा पैसा परत आणू, या घोषणांचे काय झाले. आज मराठा, बहुजन, मुस्लिम अशा घटकांचे मोर्चे निघत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

खासदार मोहिते-पाटील म्हणाले, जे पक्षातून गेले ते गेले. राहिले आहेत त्यांना ताकत द्या. जिल्ह्याच्या राजकारणात आणि संघटना वाढीसाठी पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मदत करावी. मला कोणी झोपेतून उठवले आणि नेता कोण विचारले तर आमच्या तोंडून पवारसाहेबांचेच नाव येणार, अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार स्पष्ट केला.

Web Title: Ajit Pawar takes a dig at Devendra Fadnavis Government