अजित पवारांची खेळी, साताऱ्यात दिग्गजांना धक्का

उमेश बांबरे
बुधवार, 1 जानेवारी 2020

वाईचे आमदार मकरंद पाटील यांना मंत्रीपदावर संधी मिळाली नाही. त्यामुळे वाई, खंडाळ्यातील त्यांचे समर्थक नाराज होते. ही नाराजी दूर करून खंडाळ्यात राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी पक्षश्रेष्टींनी उदय कबुले यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर संधी दिली आहे. त्यामुळे अध्यक्ष पदासाठी हटकून बसलेल्या दिग्गज सदस्यांच्यात नाराजी पसरली आहे.

सातारा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये असलेली सर्व नावे मागे पडून अखेर वाई मतदारसंघातील शिरवळ गटातील राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्य उदय कबुले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर कोरेगाव मतदारसंघातील खटाव गटाचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य प्रदिप विधाते यांना उपाध्यक्ष पद देण्यात आले. वाईत मकरंद पाटलांना मंत्री पदावर संधी न मिळाल्याने कबुलेंना अध्यक्ष पद तर कोरेगावात शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्यामुळे तेथे पक्षाला ताकद देण्यासाठी श्री. विधातेंकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. दिग्गजांची नावे मागे सारून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकिय समतोल राखण्याची खेळी केली. 

आवश्‍य वाचा : बारामतीकरांचा काश्‍मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास

जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीसाठी गेल्या दोन चार दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांत खलबते सुरू होती. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यासाठी स्वतंत्र दोन वेळा बैठका घेतल्या. त्यावेळी विद्यमान अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांना मुदतवाढ देण्यासोबतच कऱ्हाडचे ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे यांना उपाध्यक्ष पद देण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, या सर्व चर्चा बाजूला ठेवत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यात राजकिय समतोल राखत खंडाळा आणि खटाव तालुक्‍यातील निष्ठावंत सदस्यांना संधी दिली. 

हे ही वाचा : खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर गुन्हा

नवनिर्वाचित अध्यक्ष उदय कबुले हे अपक्ष म्हणून शिरवळ गटातून निवडुन आलेले आहेत. त्यांनी माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील यांचा पराभव केला होता. निवडून आल्यावर श्री. कबुले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहयोगी सदस्य स्वीकारले. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांना शिरवळ गटातून चार हजारांचे मताधिक्‍क्‍य मिळवून दिलेले आहे. खंडाळा तालुक्‍यात सर्व विरोधक एकवटलेले असतानाही श्री. कबुलेंनी राष्ट्रवादी भक्कम करण्यावर भर दिला आहे.

हे ही वाचा : मंत्रिपद न मिळाल्याने या आमदारांचे कार्यकर्ते नाराज

नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात वाईचे आमदार मकरंद पाटील यांना मंत्रीपदावर संधी मिळाली नाही. त्यामुळे वाई, खंडाळ्यातील त्यांचे समर्थक नाराज झाले होते. ही नाराजी दूर करून खंडाळ्यात राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी पक्षश्रेष्टींनी उदय कबुले यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर संधी दिली आहे. त्यामुळे अध्यक्ष पदासाठी हटकून बसलेल्या दिग्गज सदस्यांच्यात नाराजी पसरली आहे. मानसिंगराव जगदाळे यांना यापूर्वीही अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पद देण्याचे आश्‍वासन जिल्ह्यातील नेत्यांनी दिले होते. मात्र, यांना दुसऱ्यांदा थांबावे लागले आहे. 

 

प्रदिप विधाते हे राष्ट्रवादीचे जुने व माजी आमदार शशिकांत शिंदे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते व जिल्हा परिषद सदस्य असून खटाव गटातून ते निवडून आलेले आहे. कोरेगावचे भाजपचे आमदार महेश शिंदे यांचे मुळ गाव खटाव असल्याने राष्ट्रवादीने या गटातील ज्येष्ठ सदस्य म्हणून विधाते यांना उपाध्यक्ष पदाची संधी दिली आहे.

 

विधानसभा निवडणुकीत कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रतोद शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. त्यांच्यानंतर या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताकद मिळावी आणि पक्ष वाढावा, यासाठी उपाध्यक्ष पद खटाव तालुक्‍याला दिले गेले आहे. जिल्हा परिषदेच्या आजच्या पदाधिकारी निवडीत निष्ठावंत व नव्या जुन्यांचा संगम करण्यासोबतच राजकिय समतोल राखण्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर देत सर्व इच्छुकांची नावे बाजूला सारून उदय कबुले व प्रदिप विधाते यांना संधी दिली आहे. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar Took Dission in Satara Zilla Parishad President Election