बारामतीकरांचा काश्‍मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 January 2020

ठिकठिकाणच्या गावांतील नागरीक सायकलपटूंचे स्वागत करीत आहे. या संपुर्ण प्रवासात सायकलपटू "बेटी बचाओ, बेटी पढाओ'...चा संदेश देत आहेत. 

सातारा : "बेटी बचाओ, बेटी पढाओ'...चा संदेश देशभर पोचविण्यासाठी काश्‍मीर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवासाला निघालेले बारामती सायकल क्‍लबच्या सदस्यांचे नुकतेच साताऱ्यात आगमन झाले. या वेळी सातारा सायकल क्‍लब तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. जिल्हा नियोजन अधिकारी भगवानराव जगदाळे व क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 
देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून, महिला घरातच नव्हे तर घराबाहेरही सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे वंशाला दिवा हवा म्हणून गर्भातच स्त्री भ्रूणाची हत्या केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर "बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा संदेश देत काश्‍मीर ते कन्याकुमारी अशी जागृती करण्यासाठी बारामती येथील सायकल क्‍लबचे सदस्य सायकलवरून प्रवास करत आहेत.

त्यांनी 12 डिसेंबरपासून त्यांनी काश्‍मीरमधून हा सायकल प्रवास सुरू केला आहे. त्यांचे नुकतेच साताऱ्यात आगमन झाले. या सायकल प्रवासात क्‍लबचे सदस्य अजित चव्हाण, सोनाली ठवरे, राजेंद्र ठवरे, हणमंत क्षेत्री, सचिन चौधरी यांच्यासह संजय दराडे आपल्या दोन मुलींसह पत्नी सुवर्णा दराडे यांच्यासोबत सहभागी झाले आहेत.

हेही वाचा -  मंत्रिपद न मिळाल्याने येथे राष्ट्रवादीत नाराजी

जिल्हा नियोजन अधिकारी भगवानराव जगदाळे यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती सपना गोळवे, रमेश शिंदे, बाळासाहेब इंगळे, ऍड. अनुज देशमुख, रवींद्र शिंदे तसेच सातारा सायकल क्‍लबचे सदस्य उपस्थित होते. तसेच पुढील प्रवासासाठी या सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

नक्की वाचा - कोसळलेलं आयुष्य पेलताना..!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cyclist From Baramati Are Giving Messeage Of Save Girl Child