वाडेकरांना होती सांगलीशी आत्मीयता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

सांगली - भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार अजित वाडेकर यांना सांगलीविषयी आत्मीयता होती. त्यांनी स्वतः सन २००७ मध्ये ही गोष्ट सांगितली होती. नाना जोशी, विजय हजारे यांच्यासारखे क्रिकेटपटू सांगलीने दिल्याबद्दल त्यांना अभिमान वाटायचा.

सांगली - भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार अजित वाडेकर यांना सांगलीविषयी आत्मीयता होती. त्यांनी स्वतः सन २००७ मध्ये ही गोष्ट सांगितली होती. नाना जोशी, विजय हजारे यांच्यासारखे क्रिकेटपटू सांगलीने दिल्याबद्दल त्यांना अभिमान वाटायचा. कर्णधार वाडेकरांचे सांगलीत असंख्य चाहते होते. नाना जोशी बेनिफिशरी क्रिकेट सामन्यात वाडेकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर खेळलेही होते.  

अजित वाडेकर यांचे आज वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. अकरा वर्षांपूर्वी म्हणजे एप्रिल २००७ ला ते येथे आले होते. निमित्त होते बुद्धिबळातील भीष्माचार्य भाऊसाहेब पडसलगीकर यांच्या सत्काराचे.  भाऊसाहेबांना शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराने  गौरवले गेले होते. त्यानिमित्ताने वाडेकरांच्या हस्ते  त्यांचा सत्कार करण्यात आला होता. 

त्यावेळी वाडेकर म्हणाले होते, की नाना जोशी, विजय हजारे यांच्यासारखे क्रिकेटपटू, नंदू नाटेकरांसारखा महान बॅडमिंटनपटू सांगलीने देशाला दिला. भाऊसाहेबांच्या रूपाने बुद्धिबळाची सेवा करणारी महान व्यक्ती  सांगलीनेच दिली. त्यामुळे सांगलीबद्दल मला खूप आत्मीयता आहे.’’

कर्णधारपदाविषयी ते म्हणाले होते, की ‘क्रिकेटचे मैदान बुद्धिबळ पटासारखेच असते. मला वजीर (कर्णधार) बनण्याची संधी मिळाली. विजय मर्चंट यांनी पूर्णपणे व्यावसायिकता दाखवत माझ्यावर विश्‍वास टाकला. चंदू बोर्डे आणि मन्सूर अली खान पतौडीला डावलून माझ्याकडे नेतृत्व आले. ते मी निभावले. एव्हरेस्टसारखे उंच ध्येय ठेवले, की जिंकायची स्फूर्ती येते, हे मी तेव्हा शिकलो.’

इतर खेळांबद्दल प्रेम
वाडेकर यांना क्रिकेटइतकीच अन्य खेळांविषयी आपुलकी होती. ते म्हणाले होते, की ‘भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्‍वचषक जिंकला. जंगी स्वागत झाले. भरघोस बक्षिसे मिळाली. असाच सत्कार आशिया चषक विजेते हॉकीपटू, नेहरू चषक विजेते फुटबॉलपटू यांना मिळायला हवा होता. १६८ देशांत 
भारी ठरलेला विश्‍वनाथन आनंदही अशा सत्काराचा हक्कदार आहे.’

Web Title: Ajit Wadekar Memory