‘आखाडी’तून नेत्यांची साखरपेरणी

संजय जगताप
शनिवार, 27 जुलै 2019

विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर...
दोन-अडीच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठिकठिकाणच्या नेत्यांकरवी प्रमुख कार्यकर्त्यांना आखाडीचे नियोजन करण्याचे आदेशच दिले जात आहेत. पावसाचा व्यत्यय टाळण्यासाठी घरी, मळ्यात, फार्महाउसवर होणाऱ्या आखाडींसाठी ठिकठिकाणी मंगल कार्यालयांचाही आश्रय घेण्यात येत आहे. सर्वसामान्यांसाठी आखाडी झणझणीत होत असली तरी साखरपेरणीमुळे नेत्यांना आखाडी गोड वाटत आहे.

मायणी - आखाडी जत्रांना सध्या उधाण आले असून, त्यानिमित्ताने नेत्यांसह प्रमुख कार्यकर्त्यांकडून जेवणावळींचे आयोजन करण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून सामान्य कार्यकर्ते व मतदारांना चुचकारण्यात येत आहे. लोकांशी थेट संवाद साधून झणझणीत आखाडीतून नेते मंडळी साखरपेरणी करण्याची संधी साधत असल्याचे चित्र खटाव-माणमध्ये निदर्शनास येत आहे. 

खटाव-माणमध्ये सध्या आखाडी जत्रा जोमात सुरू आहेत. गेला आठवडाभर अनेकजण घरी जेवलेच नाहीत. आखाडीचे आमंत्रण सहसा कोणी डावलत नसल्याचे चित्र आहे. रिमझिम पाऊस, थोडासा गारठा अशा वातावरणात झणझणीत रस्स्यावर ताव मारणे अनेकजण पसंद करतात. त्यामुळे आखाडी जत्रांना खवैय्यांची गर्दी होताना दृष्टीस पडत आहे. गल्ली, भावकी, मळा, वस्तीवरील लोकांचा समूह आणि अनेकजण व्यक्तिगत पातळीवरही आखाडींचे नियोजन करीत आहेत. तर काही हौशी तरुण वर्गणी काढून आखाडी साजरी करीत असल्याचे चित्र आहे. त्या निमित्ताने शेजारी-पाजारी, गल्लीतील लोक, पै-पाहुणे यांच्यासह स्थानिक नेते व प्रमुख कार्यकर्त्यांनाही आमंत्रित करण्यात येत आहे. त्यातच खारे जेवण म्हटले की अनेकजण बिनबुलाए मेहमान... बनून कार्यस्थळी हजेरी लावताना दिसत आहेत. आखाडीच्या जेवणावळीसाठी याआधी घरीच सर्व पदार्थ तयार केले जात.

परंतु, अलीकडच्या काळात आखाडीचे जेवण तयार करण्यासाठी खास आचारी (केटरर) बोलावले जात आहेत. आखाडी जत्रा मांसाहारी असल्याने यापूर्वी शाकाहारी लोकांना निमंत्रित केले जात नसे. मात्र, आता त्यांचीही वेगळी सोय करण्यात येत आहे. वर्षानुवर्षे आखाडीसाठी लोकांच्या गर्दीत वाढच होऊ लागली आहे. नेते, प्रमुख कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे जत्रांना राजकीय स्वरूप येऊ लागले आहे. त्यामुळे प्रमुख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेल्या जत्रांना एखाद्या मेळावा, समारंभाचे स्वरूप येऊ लागले आहे. तेथे येणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्याची नेतेमंडळी आवर्जून गळाभेट घेताना दिसत आहे. शेतीवाडी, कौटुंबिक सुख-दु:खाबाबत विचारपूस करत आहेत. 

त्यांच्या अडीअडचणी समजावून घेत आहेत. मदतीचे, सहकार्याचे आश्वासन देत आहेत. येनकेन प्रकारे संवाद साधत मळभ दूर करून लोकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे काही कारणास्तव दुरावलेल्या नागरिकांचे मतपरिवर्तन होण्यास मदत होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhad Party Vidhansabha Election Politician