अक्कलकोट: नगरपरिषदेतर्फे संपूर्ण प्लास्टिक बंदीसाठी जोरदार मोहीम

राजशेखर चौधरी
सोमवार, 25 जून 2018

अक्कलकोट - महाराष्ट्र शासनाने पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी घेतलेला प्लॅस्टिक बंदीचा चांगला निर्णय राबविण्यासाठी नगरपरिषदेच्या पथकाने जोरदार मोहीम उघडली आहे. आज दिवसभरात पाच जणांवर थेट कारवाई केली असून, त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे २५ हजार इतकी दंड वसुली करण्यात आली आहे. 

अक्कलकोट - महाराष्ट्र शासनाने पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी घेतलेला प्लॅस्टिक बंदीचा चांगला निर्णय राबविण्यासाठी नगरपरिषदेच्या पथकाने जोरदार मोहीम उघडली आहे. आज दिवसभरात पाच जणांवर थेट कारवाई केली असून, त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे २५ हजार इतकी दंड वसुली करण्यात आली आहे. 

मागील आठवडाभरापासून वृत्तपत्रे आणि सोशल मीडियावर प्लॅस्टिक बंदी आता होणारच आणि ठरलेल्या दंड हा आपल्याला झेपणार नाही यादृष्टीने नागरिकांनी मनाची तयारी केलेली दिसत होती. आज पहाटे पासूनच दररोज भाजी मंडईत येणारे प्लॅस्टिक कॅरीबॅग विनाच आलेले दिसले. आपले व्यापारच हजारच्या घरात असते तर पाच हजार दंड कसे भरायचे या धास्तीने त्यांनी ग्राहकांना कापडी पिशवीच उद्यापासून आणा असे आवाहन करताना दिसत होते. 

अक्कलकोट हे मोठे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. याठिकाणी भाविकांची रेलचेल मोठी असते. त्यामुळे याठिकाणी कारवाई ही सातत्याने आणि वेगाने होणे गरजेचे आहे. विक्रेते प्लॅस्टिक बंदीच्या बाजूनेच आहेत पण अनेक ग्राहकांची मानसिकता अद्याप बदलली नाही. कापडी पिशवीत बाजार म्हणजे लाज वाटायचे काम किंवा कमीपणा येतो अशी मानसिकता काही जणांची आहे. ते बदलावे लागणार आहे. यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून तसेच शाळा आणि महाविद्यालयातही जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या कारवाईत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल तेली, मलय्या स्वामी, नितीन पेठकर, राजशेखर लिगाडे, विशाल कोंपा आदींनी सहभाग नोंदविला.

प्लॅस्टिकचा वापर व्यापारी व नागरिकांनी करू नये.आपल्या शेजारी राहणाऱ्यांचे प्रबोधन करावे आणि शहर प्लॅस्टिकमुक्त होण्यासाठी सहकार्य करावे. प्लॅस्टिकचा वापर कोठेही दिसल्यास नियमाप्रमाणे दंड प्रस्तावित करण्यात येईल.
डॉ प्रदीप ठेंगल, मुख्याधिकारी, अक्कलकोट

Web Title: Akkalkot: A strong campaign for the entire plastic ban by the Municipal Council