अकलूज बनलंय विकासाचे 'रोल मॉडेल'

मनोज गायकवाड
शुक्रवार, 23 मार्च 2018

अकलूज - समृद्ध अर्थकारणामुळे अकलूज (जि. सोलापूर) विकासाचे "रोल मॉडेल' बनलंय. सहकारनगरीच्या वैभवात डॉक्‍टरांच्या योगदानामुळे गावाची पश्‍चिम महाराष्ट्रातील "मेडिकल हब' अशी ओळख होत आहे. गावाच्या विकासात खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आणि परिवाराचा यात वाटा आहे.

अकलूज - समृद्ध अर्थकारणामुळे अकलूज (जि. सोलापूर) विकासाचे "रोल मॉडेल' बनलंय. सहकारनगरीच्या वैभवात डॉक्‍टरांच्या योगदानामुळे गावाची पश्‍चिम महाराष्ट्रातील "मेडिकल हब' अशी ओळख होत आहे. गावाच्या विकासात खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आणि परिवाराचा यात वाटा आहे.

अकलूजच्या विस्ताराला बाह्यवळण रस्त्यांमुळे गती मिळाली. गावपेठेतील दुकानदारी अत्याधुनिक दालनांमध्ये रूपांतरित झाली. शिक्षण प्रसारक मंडळाची शाळा-महाविद्यालये, रत्नाई महिला संकुल, शिवरत्न नॉलेज सिटी, ग्रीन फिंगर्स स्कूल यातून शिक्षणाचा परीघ विस्तारला. विशाल आणि सुविधायुक्त क्रीडा संकुलाने खेळाडूंची सोय झाली. सुपरस्पेशालिटी दर्जाच्या वैद्यकीय सुविधा खासगी डॉक्‍टरांनी उपलब्ध करून दिल्या. राज्यस्तरीय लावणी स्पर्धा, लेझीम स्पर्धा, आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्विमिंग पूल, 105 फूट उंचीचा राष्ट्रध्वज इथल्या क्रीडा-सांस्कृतिक जीवनाची वैशिष्ट्ये आहेत. गावात बालरोगापासून ते हृदयरोगापर्यंत वैद्यकीय इलाज आणि शस्त्रक्रिया होतात. गावात औषधांची घाऊक बाजारपेठ उभी राहिली आहे. ग्रामपंचायतीच्या या गावात उपप्रादेशिक परिवहन विभाग, उपविभागीय अधिकारी, पोलीस उपअधीक्षक, सार्वजनिक बांधकाम ही कार्यालये आहेत. उपरुग्णालयात कोट्यवधींच्या मोफत आरोग्य सुविधा आहेत.

पर्यटनाने लावलेत चार-चॉंद
सिंचन सुविधा, साखर कारखाना, शेतीपूरक उद्योग यातून शेतकऱ्यांनी प्रगतीला गवसणी घातली. इथल्या घोडे बाजारातून कोट्यवधींची उलाढाल होते. शिवामृत गार्डन, शिवपार्वती मंदिर लेझर शो, अकलाई मंदिर परिसर, आनंदी गणेश मंदिर, सयाजीराजे वॉटर पार्क, नीरा नदीतीरावरील किल्ल्यात साकारलेली शिवसृष्टी यांमुळे अकलूजचे अस्तित्व पर्यटनाच्या नकाशावर उठावदार झाले.

सरपंच शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते-पाटील आणि सदस्यांचा निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचा सहभाग असतो. पन्नास हजार लोकसंख्येच्या अकलूज ग्रामपंचायतीचा वार्षिक ताळेबंद 7 कोटींपर्यंत आहे. जीपीएस प्रणालीचा घंटागाड्यांसाठी आणि घरपट्टी वसुलीसाठी जीआयएस प्रणालीचा वापर करणारी ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत आहे.

"सैराट'मधील "आर्ची'चे गाव!
"स्मृतिभवन' या अत्याधुनिक नाट्यगृहाची उपलब्धता आणि कलावंतांना प्रोत्साहनामुळे अकलूजने चांगले कलावंत दिले आहेत. हिंदी, मराठी चित्रपटांप्रमाणेच मालिकांचे चित्रीकरण इथे होते. गेल्या वर्षी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचे राष्ट्रपती पदक मिळवलेले मकरंद माने, बहुचर्चित "सैराट' चित्रपटातील नायिका आर्ची (रिंकू राजगुरू) यांच्यासह इथले अनेक कलावंत रुपेरी दुनियेत स्थिरावलेत.

Web Title: akluj solapur news development roll model