Vidhansabha2019 : जयकुमार गाेरे हटाव सर्व पक्षीय नेत्यांचे ठरलं

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

गोरे बंधूंना हटविणे हेच आमचे सर्वांचे ध्येय आहे. या एकीतून विधानसभा निवडणुकीसाठी आमच्यामधील एकच उमेदवार असेल असे ही डॉ. येळगावकर यांनी नमूद केले. 

सातारा : माण मतदारसंघाच्या विकासाच्या आड येणारी प्रवृत्ती थोपविण्यासाठी माण व खटाव तालुक्‍यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आज (सोमवार) साताऱ्यात एकत्र आले. या सर्वांनी आगामी विधानसभा निवडणुकीतून गोरे बंधू हटावची शपथ घेतली. खटावचे कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात माणमधील सर्वपक्षीय आज (सोमवार) साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये आले. या बैठकीस भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, भाजपचे उपाध्यक्ष अनिल देसाई, शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख, रासपचे जिल्हाध्यक्ष मामुशेठ वीरकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुभाष नरळे यांच्यासह तालुक्‍यामधील विविध पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
या बैठकीत सर्वांचा एकच सूच होता. गोरे बंधू नको. त्यानूसार झालेल्या चर्चेतून सर्वानूमते गोरे बंधू हटावचा निर्णय घेण्यात आला. उभयंत्यांनी केवळ निर्णय न घेता शपथच घेतली. 
डॉ. येळगावकर म्हणाले गेल्या 20 वर्षांत माण तालुक्‍यातील विकास जखडला आहे. माणमध्ये आजपर्यंतच्या वाटचालीस गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने घेतली. माण मतदारसंघाला एक इतिहास आहे. आजपर्यंत गोरे बंधूंनी तालुक्‍यात गुंड प्रवृत्तीस चालना दिली. राजकारण आणले. यामुळे तालुक्‍याच्या विकासाच्या आड येणाऱ्या प्रवृत्तीस थोपविण्याचा आम्ही निर्धार केला आहे. गोरे बंधूंना हटविणे हेच आमचे ध्येय आहे. आमदार गोरेंच्या विरोधाच्या लढ्यात तालुक्‍यातील अनेकजण सहभागी होऊ इच्छितात. आगामी काळात आम्ही आपापाल्या पक्ष नेतृत्वास भेटून याबाबतची माहिती देणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर ही गोष्ट घातली आहे. या एकीतून विधानसभा निवडणुकीसाठी आमच्यामधील एकच उमेदवार असेल असे ही डॉ. येळगावकर यांनी नमूद केले. 
डॉ. येळगावकर म्हणाले तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात माण - खटावला पाणी देणाऱ्या 50 टक्के योजना ठप्प झाल्या. जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी जिहे कठापूरसह अन्य योजनांना गती दिली. उरमोडीचे पाणी आले नाही तर मी विधानसभा निवडणुक लढविणार नाही अशी वल्गना आमदार गोरे यांनी केली आहे. खरं तर हे पाणी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आले आहे. 
रासपचे जिल्हाध्यक्ष मामुशेठ वीरकर म्हणाले उत्तर माणच्या 32 गावांना दहा वर्षांत त्यांना पाणी देता आले नाही. त्यांनी (गोरे व खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर) यांनी आंधळी धरणाच्या येथे बोअरवेल घेऊन पाणी देण्याचा कार्यक्रम केला. ही जनतेची घोर फसवणुक केली आहे. 
आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे तुमच्या सोबत येणार आहेत असे विचारले असता, ते आलेच तर आम्ही स्वागत करु. मात्र त्यांनी उमेदवारीची अपेक्षा ठेवून येऊ नये असे डॉ. येळगावकर यांनी स्पष्ट केले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All political leaders from mann united against mla jaykumar gore