खासगी शाळांच्या बरोबरीने जि. प. शाळांचाही ऑनलाईन अभ्यास 

शांताराम पाटील
Tuesday, 6 October 2020

 कोरोनाच्या संकट काळात जिल्हा परिषद शाळांनी देखील खासगी शाळांच्या बरोबरीने विद्यार्थ्यांकडून कंबर कसून तयारी करुन घेतल्याचे चित्र आहे. लवकरच होणाऱ्या प्रथमसत्र परीक्षांतून याचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

इस्लामपूर :  कोरोनाच्या संकट काळात जिल्हा परिषद शाळांनी देखील खासगी शाळांच्या बरोबरीने विद्यार्थ्यांकडून कंबर कसून तयारी करुन घेतल्याचे चित्र आहे. लवकरच होणाऱ्या प्रथमसत्र परीक्षांतून याचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे दहावी, बारावीची कशीबशी परीक्षा पूर्ण झाली. परंतु इतर वर्गांच्या परीक्षा शासनाने रद्द करण्याचा आदेश काढला. घरात बसून ऑनलाइन शाळा सुरू सुरु झाली. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद, पुणे यांनी तीन-तीन महिन्यांच्या दिनदर्शिका शाळांना देऊन त्यानुसार प्रत्येक शाळेत त्यांची तयारी सुरू झाली. 

परंतु जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या पुढे ऑनलाईन माध्यमाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. सर्वसामान्य गरीब कष्टकरी लोकांची मुले प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत. सर्वांच्याकडे ऍड्रॉईड मोबाईल उपलब्ध नसल्याने ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली होती. मात्र, अडचणींवर मात करून प्राथमिक विभागातील शिक्षकांनी उपाय शोधत मुलांना ऑनलाइन शिक्षण घरोघरी पोचवले. 

गुगल मिट, समूह ग्रुप तयार करण्यात आले. त्या त्या केंद्रातील पाच शिक्षक, पाच पालक व पाच विद्यार्थी यांचा समूह ग्रुप तयार करण्यात आला. या सर्वानी विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहचवण्यासाठी प्रयत्न केले. अँड्रॉईड मोबाईलची मोठी समस्या होती. काही गरीब विद्यार्थ्यांजवळ मोबाईल उपलब्ध नव्हते. त्यावर पर्याय म्हणून काही शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचून हे काम पूर्ण केले. काही विदयार्थ्यांना त्यांच्या मित्राचा, शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल उपलब्ध करून देऊन त्याच्याकडून ऑनलाइन शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न झाले. गेली चार महिने शिक्षकांची ही धडपड सुरु होती. आता प्रथम सत्र परिक्षा जवळ आल्या आहेत. या परिक्षांच्या निकालातून शिक्षकांच्या प्रयत्नाचे फलित दिसून येणार आहे. 
 

ज्या ठिकाणी मोबाईलची उपलब्धता होत नाही त्या ठिकाणी गल्लीतील मित्र, शिक्षक, पालक मित्र यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. काही ठिकाणी अजिबातच मोबाईल नाही त्याठिकाणी कोरोना बाबतीत सर्व काळजी घेऊन स्वतः शिक्षक व्यक्तिशः जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. 
- छाया माळी, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, इस्लामपूर.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Along with private schools, Dist. W. Online study of schools too