नवा पूल बांधून कधी पूर्ण होणार?

सुधाकर काशीद
मंगळवार, 17 जुलै 2018

कोल्हापूर - पंचगंगा नदीवरील पर्यायी नवीन पुलास मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू होण्यास अकरा वर्षे लागली. काम सुरू झाले. पुलाच्या दोन कमानीही उभ्या राहिल्या आणि तिसऱ्या कमानीच्या आड येणाऱ्या झाडांचा मुद्दा पुढे आला. पुढे पुरातत्त्व खात्याचा मोठा अडथळा झाला. त्याच्याही पुढे जाऊन या पुलासाठी पुरातत्त्व खात्याचा कायदा लोकसभेत बदलून घ्यावा लागला. त्यानंतर पुलाच्या पुढच्या बांधकामासाठी पायाखोदाईला प्रारंभ झाला आणि आता या क्षणी दोन अधिकाऱ्यांतील तांत्रिक मतभेदामुळे पूल पुन्हा वादात अडकला आहे.

कोल्हापूर - पंचगंगा नदीवरील पर्यायी नवीन पुलास मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू होण्यास अकरा वर्षे लागली. काम सुरू झाले. पुलाच्या दोन कमानीही उभ्या राहिल्या आणि तिसऱ्या कमानीच्या आड येणाऱ्या झाडांचा मुद्दा पुढे आला. पुढे पुरातत्त्व खात्याचा मोठा अडथळा झाला. त्याच्याही पुढे जाऊन या पुलासाठी पुरातत्त्व खात्याचा कायदा लोकसभेत बदलून घ्यावा लागला. त्यानंतर पुलाच्या पुढच्या बांधकामासाठी पायाखोदाईला प्रारंभ झाला आणि आता या क्षणी दोन अधिकाऱ्यांतील तांत्रिक मतभेदामुळे पूल पुन्हा वादात अडकला आहे. त्यामुळे खरोखरच प्रशासनाला हा पूल बांधायचा आहे काय, हाच प्रश्‍न कोल्हापूरवासीयांच्या मनात येऊ लागला आहे. 

पंचगंगेवरील पर्यायी नवीन शिवाजी पूल हा अत्यावश्‍यक सेवेचा भाग आहे. जुन्या पुलाने कधीच शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे नवीन पूल बांधणे ही काळाची गरज आहे; पण या नवीन पुलाचा अक्षरशः खेळखंडोबा झाला आहे. अनावश्‍यक वादात अडकत अडकत तो रेंगाळला आहे. किंबहुना हा अर्ध्यावर बांधलेला पूल म्हणजे थट्टेचा विषय झाला आहे. 

लोकआंदोलनाच्या रेट्यामुळे त्याला थोडीफार गती आली आहे. पण आता पुन्हा पुलाच्या कमानीचा तांत्रिक आराखडा दोन अधिकाऱ्यांतील टोकाच्या वादाचा मुद्दा होऊन काम थांबले आहे. या दोन अधिकाऱ्यांतील कोण तरी एक बरोबर किंवा कोण तरी एक चूक आहे. पण त्याचा सोक्षमोक्ष लावण्याची गरज आहे. कारण गेली १५ वर्षे वादात अडकलेल्या पुलाबद्दल आता शेवटच्या टप्यात तांत्रिक मुद्द्यावर अधिकाऱ्यातच वाद होणे म्हणजे कोल्हापूरकरांच्या सहनशक्तीचाच तो अंत ठरणार आहे.

पर्यायी पूल तीन कमानीचा आहे. त्यापैकी दोन कमानी उभ्या झाल्या आहेत. तिसऱ्या कमानीसाठी पाया काढायला सुरुवात झाली आहे. पण संपत आबदार या अभियंत्याने या कामाला आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते पुलाच्या पायासाठी भूगर्भातील खडकाची चाचणी व्यवस्थित झालेली नाही. पाया खोदाईसाठी बोअर खोदाई झालेली नाही. पाया मुजवताना त्यात वरिष्ठांच्या अनुमतीशिवाय दगड कसे भरले जात आहेत, असे तांत्रिक प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले आहेत. त्या तांत्रिक मुद्द्याचा अभ्यास खूप उच्च तांत्रिक पातळीवरच तपासला तरच त्यातील खरे-खोटेपणा उघड होणार आहे. 

अर्थात अशा तांत्रिक मुद्द्यांमुळे श्री. आबदार यांनी पुलाच्या तिसऱ्या कामानीसाठी आवश्‍यक अंतिम तांत्रिक अहवालच अद्याप सादर केलेला नाही. त्यामुळे कंत्राटदाराने पुढे काम सुरू केलेले नाही. पायासाठी केलेल्या खोदाईच्यावर पाणी आले आहे. तोही कामातील एक अडथळा आहे. 

दरम्यान, संपत आबदार यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित केले असले तर त्यांचे मुद्दे चूक आहेत की, ते जाणीवपूर्वक अडथळा आणण्यासाठी असे मुद्दे उपस्थित करत आहेत हे तपासण्याचीही गरज आहे. किंवा त्यांचे मुद्दे बरोबर असतील तर त्या मुद्द्यांचा विचार केला जाईल, असे सांगण्याची गरज आहे. या तांत्रिक मुद्द्यातील गर्भितार्थ सर्वसामान्य कोल्हापूरकरांना निश्‍चितच कळणार नाही. पण सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरिष्ठांनी एकदा या मुद्द्यांचा सोक्षमोक्ष लावण्याची गरज आहे. नाहीतर नवीन पूल नव्या वादात पुन्हा अडकणार हे स्पष्ट आहे. 

संपत आबदार यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत, त्या संदर्भात त्यांनी माझ्याशी कधीही चर्चा केलेली नाही. त्यांना जे मुद्दे मांडायचे आहेत ते फेसबुक, व्हॉटस्‌ ॲपवर न मांडता कार्यालयीन कार्यपद्धतीने मांडावेत. त्यांनी तांत्रिक आराखडा दिल्याशिवाय पुढच्या कामाला वेग येणार नाही.   
- विजय कांडगावे (कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग)

Web Title: An alternative new bridge over Panchganga River