साखर तेजीत तरीही 'एफआरपी' थकीत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

साखर दरातील तेजीमुळे साखर कारखान्यांकडून थकलेली एफआरपी किमान जून अखेर तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित होते. जुलैचा पहिला आठवडा संपला तरी बिले अद्यापही जमा झालेली नाहीत.

सांगली - जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी नविन हंगामसाठी रोलर पुजन सुरु केले आहे. साखरेच्या दरातही तेजी आहे. तरीही जिल्ह्यातील दहा साखर कारखान्यांची एफआरपी थकली आहे. काही साखर कारखान्यांनी पहिले बिलही दिलेले नाहीत. खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. 

साखर दरातील तेजीमुळे साखर कारखान्यांकडून थकलेली एफआरपी किमान जून अखेर तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित होते. जुलैचा पहिला आठवडा संपला तरी बिले अद्यापही जमा झालेली नाहीत. शेतकरी आर्थिक अडचणीत असताना यंदाच्या हंगामाची तयारी सुरु केली आहे. श्री दत्त इंडिया, विश्‍वास साखर कारखाना, मोहनराव शिंदे कारखान्यांसह आदी कारखान्यांचे रोलर पुजन झाले आहे. क्रांती, सोनहिरासह काही साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीची एफआरपी प्रमाणे होणारी रक्कमाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनीही एफआरपी रक्कमा जमा केल्या आहेत. जिल्ह्यात दोन-तीन कारखान्यांचा अपवाद सोडला तर एफआरपीची रक्कमा मिळालेल्या नाहीत. काही कारखान्यांनी शेवटच्या दीड महिन्यात गाळलेल्या उसाचे पहिले बिलही दिले नाही. 

ऊस दर नियंत्रण कायद्यानुसार साखर कारखान्यांनी ऊस गाळपानंतर 14 दिवसात एफआरपी देणे बंधनकारक आहे. यामध्ये कारखाने असमर्थत ठरल्यास जिल्हा प्रशासनाला कारवाईचे अधिकार आहेत. विशेष म्हणजे एफआरपी थकल्यास त्या रक्कमेचे व्याजही देणे बंधनकारक आहे. मात्र या तरतुदीकडे सर्वच कारखान्यांनी दुर्लक्ष केले आहे. 

सांगली जिल्ह्यातील दहा कारखान्यांकडे 162 कोटी थकीत... 
जिल्ह्यातील हुतात्मा, साखराळे, कारंदवाडी, वाटेगाव, सद्गगुरु, विश्‍वास, केनऍग्रो, उदगिर, महांकाली, माणगंगा साखर कारखान्यांकडे 162 कोटी रुपयांची एफआरपी थकली आहे. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Although sugar prices have increased farmers have not yet received FRP