अंबाबाई पुजारीपदासाठी एकूण 113 अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

कोल्हापूर - अंबाबाई मंदिरातील पगारी पुजारीपदासाठी एकूण 113 अर्ज आले असून, त्यांत सहा महिलांचा समावेश आहे. मात्र, सध्या मंदिरात पुजारी म्हणून कार्यरत असलेल्यांपैकी एकाही पुजाऱ्याने अर्ज केलेला नाही. येत्या मंगळवारपासून (ता. 19) सलग तीन दिवस अर्जदारांच्या मुलाखती होणार असून, त्यातून एकूण 55 पुजाऱ्यांची निवड केली जाईल. त्यात अकरा मुख्य पुजाऱ्यांचा समावेश असेल. निवडीनंतर त्यांना वीस दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

अंबाबाईला पारंपरिक साडीऐवजी घागराचोली पेहेराव परिधान केल्यानंतर आंदोलन तीव्र झाले आणि पुजारी हटाओ संघर्ष समितीच्या पाठपुराव्यानंतर अंबाबाई मंदिरासाठी स्वतंत्र कायदा मंजूर झाला आहे. मात्र, त्याच्या अंमलबजावणीचे आदेश मिळण्यापूर्वी आवश्‍यक तयारीचा भाग म्हणून पहिल्या टप्प्यात पुजारी नेमणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तशा सूचना राज्याच्या विधी व न्याय मंत्रालयातर्फे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला देण्यात आल्या आहेत. या पदासाठी आलेल्या अर्जांच्या पार्श्वभूमीवर निवड प्रक्रिया कशी राबवायची, यासाठी काल मुंबईत झालेल्या बैठकीत चर्चा झाली.

अंबाबाईच्या नित्यपूजाविधींसह मंत्रपठण, वर्षभरातील विविध धार्मिक विधी, सालंकृत पूजा, नैवेद्यापासून अभिषेकापर्यंत अशा सर्व गोष्टी पारंपरिक पद्धतीने व काळजीपूर्वक झाल्या पाहिजेत, यासाठी देवस्थान समितीतर्फे विशेष खबरदारी घेतली आहे.

मुलाखती घेण्यासाठी स्वतंत्र समितीची नियुक्ती केली असून, त्यात मंदिर व धार्मिक विधी अभ्यासक गणेश नेर्लेकर, संस्कृत भाषातज्ज्ञ प्रा. शिवदास जाधव, देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, सदस्य शिवाजीराव जाधव, संगीता खाडे व शंकराचार्य पीठाचा एक प्रतिनिधी यांचा समावेश आहे. मुख्य अकरा पुजाऱ्यांसह 35 सहायक पुजारी आणि सेवेकरी अशा एकूण 55 पुजाऱ्यांची नेमणूक ही समिती करेल. मात्र, देवस्थान समितीचा निर्णय अंतिम राहील. देवस्थान समिती विधी व न्याय विभागाच्या परवानगीनेच सर्व प्रक्रिया पार पाडणार आहे.

कायदा मंजूर झाला म्हणजे त्याची तत्काळ अंमलबजावणी होत नसते. तत्पूर्वी आवश्‍यक तयारी देवस्थान समितीने सुरू केली असून, पुजारी हटाओ संघर्ष समितीने सहकार्य करावे.
- महेश जाधव, अध्यक्ष, देवस्थान समिती

Web Title: ambabai pujari post form