राजकारणातून समाजकारणाला प्राधान्य

राजकारणातून समाजकारणाला प्राधान्य

ना राजकीय वरदहस्त, ना पिढीजात संस्थांचा वारसा, तरीही राजकारणाचे विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागल तालुक्‍यात माजी आमदार संजय घाटगे यांनी घाटगे गटाचा पाया भक्‍कम केला आहे. निवडणूक कोणतीही असो आणि प्रतिस्पर्धी कोणीही असो, मैदान मारल्याशिवाय माघार नाही, अशीच घाटगे गटाची वाटचाल राहिली आहे. कार्यकर्त्यांच्या या ताकदीवरच मी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ‘गोकुळ’मध्ये धडक दिली. राजकारणात मिळेल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. भविष्यातही मोठ्या ताकदीने राजकारण आणि समाजकारण करण्यालाच आपले प्राधान्य राहणार, असे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अंबरिश घाटगे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

घाटगे म्हणाले, ‘‘जिल्ह्याच्या राजकारणात संघर्ष करून यश मिळवणारा गट म्हणजे घाटगे गट, अशी ओळख निर्माण केली आहे. संघर्ष आमच्या पाचवीला पुजला आहे. त्यामुळे राजकारणात सहजासहजी घाटगे गटाला कोणते पद मिळालेले नाही. मात्र, प्रामाणिक कार्यकर्त्यांची फौज पाठीशी असल्याने घाटगे गटाने आजपर्यंत पंचायत समितीपासून विधानसभेपर्यंत सर्वत्र लखलखीत यश मिळवले आहे.

सर्वांत तरुण पंचायत समिती सभापती होण्याचा मानही याच तालुक्‍यातील जनतेने दिला. पंचायत समितीत काम करत असताना ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो, लोकांच्या अडीअडचणी काय आहेत, याची जाणीव झाली. त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. पंचायत समितीच्या कामातूनच एक पाऊल पुढे टाकत जिल्हा परिषदेत प्रवेश मिळवला.’’ 

जिल्हा परिषदेत अर्थ व शिक्षण खात्याचे सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या ठिकाणी घेतलेला प्रत्येक निर्णय हा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर परिणाम करणारा ठरत असतो. त्यामुळेच प्रत्येक योजना, उपक्रम हा सर्व जिल्हा डोळ्यासमोर ठेवून घ्यावा लागतो. त्यातच अर्थ समितीचा सभापती असल्याने सर्वच विभागांशी संबंध येत आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत जीवनपयोगी योजना पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून कामकाज करत आहे.

आजपर्यंत समाजकल्याण विभागाने कधीही कोंबडी पालन, शेळीपालन योजना घेतली नाही. महिला बालकल्याण विभागानेही अशा योजनांचा विचार केला नाही. योजना छोट्या वाटत असल्या, तरीही त्या मोठ्या परिणामकारक असल्याने आपण या योजनांची आता अंमलबजावणी करत आहोत. लोकप्रतिनिधींनीही या छोट्या योजनांवर लक्ष दिले, तर ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलेल, याची खात्री असल्याचे घाटगे यांनी सांगितले. 

बऱ्याच वेळा शिक्षणाचे काम करत असताना ‘आउट ऑफ वे’ जाऊन काम करावे लागते. या विभागाच्या माध्यमातून डिजिटल शाळा करण्याचा संकल्प केला. जिल्ह्यातील डिजिटल शाळांची संख्या ४४७ वरून १९०० पर्यंत नेण्यात यश आले. अगदी कमी वेळेत हे काम आम्ही केले आहे. त्याचबरोबर जे. पी. नाईक माझी शाळा समृद्ध शाळा, या अभियानाने तर जिल्हा परिषद शाळांचे रूपडे पालटले आहे. या शाळांना विक्रमी असा १६ कोटी रुपयांचा लोकसहभाग मिळाला आहे. आज शिक्षण विभागाचे बजेट ४ कोटी इतके आहे. मात्र, लोकसहभागाची रक्‍कमही मूळ बजेटच्या चौपट मिळाली आहे. चांगल्या कामाची ही पोहोचपावतीच असल्याचे घाटगे यांनी सांगितले. 

आज ‘गोकुळ’सारख्या देशातील नामांकित संस्थेवर काम करण्याची संधीदेखील कार्यकर्त्यांमुळे मिळाली. या संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या सुखदु:खात सहभागी होता आले आहे. आगामी काळातही या सर्व अनुभवाच्या शिदोरीवर राजकारणातील पुढील टप्पा पार करण्यासाठी घाटगे गट सज्ज झाला असल्याचे अंबरिश घाटगे 
यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com