रुग्णवाहिकेचा सायरन...अन्‌ सेकंदातच रस्ता मोकळा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

सांगली - लाखोंच्या संख्येने जनसमुदाय असतानाही मराठा क्रांती मोर्चात अतिशय नेटक्‍या आणि काटेकोर संयोजनाचे दर्शन घडले. रुग्णवाहिकेचा सायरन वाजल्यानंतर...काही सेकंदातच रस्ता मोकळा करून दिला गेला. स्वयंसेवकांनी पोलिसांना विश्रांती देत स्वत:च मोर्चाच्या मार्गावर बंदोबस्त केला. 

सांगली - लाखोंच्या संख्येने जनसमुदाय असतानाही मराठा क्रांती मोर्चात अतिशय नेटक्‍या आणि काटेकोर संयोजनाचे दर्शन घडले. रुग्णवाहिकेचा सायरन वाजल्यानंतर...काही सेकंदातच रस्ता मोकळा करून दिला गेला. स्वयंसेवकांनी पोलिसांना विश्रांती देत स्वत:च मोर्चाच्या मार्गावर बंदोबस्त केला. 

सकाळी सहा पासूनच राम मंदिर ते विश्रामबागपर्यंतच्या रस्त्यावर काळा टी-शर्ट व टोप्या घातलेले स्वयंसेवक शिस्तीत उभे होते. विविध मार्गांवरून मोर्चाच्या रस्त्यावर येणारे कार्यकर्ते, महिलांना त्यांनी मार्गदर्शन करत शिस्त लावली. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास मोर्चा विश्रामबाग येथून निघून दुपारी 12 वाजता राममंदिरपर्यंत येईपर्यंत त्यांनी साखळी सोडली नाही. मोर्चाच्या अग्रभागी महिला आणि मागे कार्यकर्ते होते. मोर्चा थांबल्यानंतरही स्वयंसेवकांनी शिस्त सोडली नाही. 

मोर्चापूर्वी स्वयंसेवकाची शिस्त पाहण्यासाठी एक रुग्णवाहिका "ट्रायल' साठी विश्रामबागहून निघाली. काही मिनिटांतच ती राममंदिरमार्गे सिव्हिल हॉस्पिटलकडे गेली. मोर्चा सुरू असताना उन्हाचा तडाखा कायम होता.

मोर्चातील भाषण आटोपल्यानंतर वेलणकर मंगल कार्यालयापलीकडे एका कार्यकर्त्याला त्रास होऊ लागला. माईकवरून याबाबत माहिती दिल्यानंतर सिव्हिलकडून वेलणकरकडे जाण्यासाठी तत्काळ रुग्णवाहिका सायरन वाजवत आली. काही सेकंदातच रुग्णवाहिकेला स्वयंसेवकांनी रस्ता मोकळा करून दिला. त्यामुळे संबंधितावर तत्काळ उपचार करता आले. 

दुपारी सव्वा वाजता मोर्चा संपल्यानंतर कार्यकर्ते परतीच्या मार्गावर लागले. तेव्हाही स्वयंसेवकांनी बंदोबस्त सोडला नाही. आजूबाजूला पडलेल्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, कागदी प्लेट सर्व गोळा करून स्वच्छता अभियान राबवले. दुपारी चारपर्यंत स्वच्छता मोहीम राबवून रस्ता स्वच्छ केला. स्वयंसेवक कसा असावा? याचे जिवंत उदाहरण आजच्या मोर्चाच्या रूपाने दिसून आले. 

शिस्तीचे कौतुक- 
कोपर्डी येथील घटनेचा निषेध म्हणून आज लाखोंच्या संख्येने काळ्या रंगाचे टी-शर्ट घालून कार्यकर्ते, तरुण-तरुणी सहभागी झाले होते. स्वयंसेवक देखील याच वेशात होते. त्यांनी सर्वांनाच शिस्त लावली. त्यामुळे मोर्चात कोणताही गोंधळ उडाला नाही. त्यांच्या शिस्तीचे सर्वांनीच कौतुक केले. 

पोलिसांना विश्राम- 
सकाळी सहापासून पोलिस बंदोबस्त शहरासह प्रमुख मार्गावर तैनात होता. मोर्चाच्या मार्गाला जोडणाऱ्या इतर रस्त्यांवरही पोलिस होते. राम मंदिर ते विश्रामबागपर्यंत स्वयंसेवकांनी "सावधान' रहात पोलिसांना "विश्राम' मध्ये राहण्याची संधी दिली. त्यामुळे एरव्ही बंदोबस्ताचा असलेला ताण मोर्चात पोलिसांना जाणवला नाही.

Web Title: ambulance sirens and open road