अमित शहा २८ ला सांगली दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

सांगली - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येत्या २८ ला सांगली दौऱ्यावर येणार आहेत.  यानिमित्ताने श्री. शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली, कोल्हापूर, सातारा व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या बूथप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत.

सांगली - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येत्या २८ ला सांगली दौऱ्यावर येणार आहेत.  यानिमित्ताने श्री. शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली, कोल्हापूर, सातारा व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या बूथप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत.

मुंबई येथे पक्ष बैठकीत दौऱ्याबाबत  अंतिम चर्चा झाली असून कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा व्हिडिओ  कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानिमित्ताने भाजपच्या प्रचाराचा नारळच फुटणार आहे. 

भाजपसाठी पश्‍चिम महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी आणि शक्तिप्रदर्शनासाठी श्री. शहा यांचा  २४ जानेवारीला सांगली दौरा निश्‍चित झाला होता; परंतु त्यांना स्वाईन फ्लू झाल्यामुळे दौरा रद्द करण्यात आला. श्री. शहा यांच्या दौऱ्यासंदर्भात मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. 
श्री. शहा २८ रोजी दुपारी दोनला सांगलीत येतील.

सांगली, कोल्हापूर, सातारा व हातकणंगले  मतदारसंघातील भाजपच्या बूथ कमिटी, केंद्रप्रमुख तसेच आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यास मार्गदर्शन करतील. कर्नाळ रस्त्यावरील धनंजय गार्डन कार्यालय निश्‍चित करण्याच्या सूचना आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी चारही मतदारसंघांच्या बूथनिहाय सर्व प्रकारच्या तयारीचा आढावा होईल. यानिमित्ताने भाजपच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडणार आहे. 

विश्रामबाग पुलाचे उद्‌घाटन होणार
विश्रामबाग उड्डाण पुलाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. आठवड्यात पूल पूर्ण होईल. आयर्विन पुलाला पर्यायी पूल, हरिपूर-कोथळी पूलही त्यांच्या पुढाकाराने मंजूर झाला आहे. दोन दिवसांत ठेकेदार निश्‍चित होईल. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारकिर्दीतील हे मोठे काम आहे. शहा यांच्या हस्ते विश्रामबाग उड्डाण पुलाचे उद्‌घाटन आणि दोन्ही पुलांच्या भूमिपूजनाच्या हालचाली सुरू आहेत.

 

Web Title: Amit Shah on Sangli tour from 28 February