कधी रे येशील तू...?

आनंद गायकवाड
गुरुवार, 14 जून 2018

आश्वी - तो देशसेवेने झपाटलेला.. त्यासाठी लष्करात भरती होण्याचे स्वप्न त्याने लहानपणापासून पाहिले. ते खरे करून दाखविले; मात्र लष्कराच्या जबलपूर (मध्य प्रदेश) येथील प्रशिक्षण केंद्रातून 13 वर्षांपूर्वी तो बेपत्ता झाला. लष्कराकडेही त्याची काहीही माहिती नाही. मात्र, आपला मुलगा एक दिवस नक्की घरी येईल, या आशेवर त्याचे कुटुंबीय वाटेकडे नजर लावून बसले आहेत..!

आश्वी - तो देशसेवेने झपाटलेला.. त्यासाठी लष्करात भरती होण्याचे स्वप्न त्याने लहानपणापासून पाहिले. ते खरे करून दाखविले; मात्र लष्कराच्या जबलपूर (मध्य प्रदेश) येथील प्रशिक्षण केंद्रातून 13 वर्षांपूर्वी तो बेपत्ता झाला. लष्कराकडेही त्याची काहीही माहिती नाही. मात्र, आपला मुलगा एक दिवस नक्की घरी येईल, या आशेवर त्याचे कुटुंबीय वाटेकडे नजर लावून बसले आहेत..!

संगमनेर तालुक्‍यातील धांदरफळ खुर्द येथील अमोल संपत खताळ असे या जवानाचे नाव. लष्करातील सिग्नल रेजिमेंटमध्ये तीन सप्टेंबर 2004 रोजी अमोल भरती झाला. जबलपूर येथे त्याचे प्रशिक्षण सुरू झाले. 19 मे 2005 रोजी त्याचा कुटुंबीयांना फोन आला. 11 ते 27 जून 2005 या कालावधीत सुटी घेऊन घरी येणार असून, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कामावर हजर होणार असल्याचे त्याने सांगितले. कुटुंबीयांचा अमोलशी झालेला हा शेवटचा संवाद.

जबलपूर येथील प्रशिक्षण केंद्रातून 31 मे 2005 रोजी अमोल निघून गेल्याची तार आठ जून 2005 रोजी त्याच्या घरी आली नि त्याचे कुटुंबीय चक्रावले. मोठा भाऊ नीलेशने तातडीने जबलपूर गाठले. चौकशी केली असता, अंगावरच्या कपड्यानिशी अमोल प्रशिक्षण केंद्रातून निघून गेल्याचे त्यांना सांगण्यात आले. तेथे त्याचे रोजच्या वापरातील साहित्य व बॅंकेत पैसे होते. नीलेशने 14 नोव्हेंबर 2005 रोजी गोराबाजार (जबलपूर) येथील पोलिस ठाण्यात अमोल बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

प्रशिक्षण केंद्रातून अमोल पळून गेल्याचे पत्र घरी आल्याने त्याच्या घरच्यांना धक्का बसला. स्वखुशीने लष्करात भरती झालेला अमोल पळून जाऊच शकत नाही, यावर आजही ते ठाम आहेत. दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह खाते व लष्कराकडे याबाबत अमोलच्या कुटुंबीयांनी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे; मात्र 13 वर्षांनंतरही त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.

अमोलचा शोध घेण्यासाठी दोन वेळा जबलपूरच्या प्रशिक्षण केंद्रात दाद मागितली. राष्ट्रपतींपासून सर्वत्र पत्रव्यवहार केला; मात्र पदरी निराशा पडली. अमोलची पेटी, कपडे आणि किरकोळ वस्तू अजूनही प्रशिक्षण केंद्रातच आहेत. प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत.
- नीलेश खताळ, अमोलचा मोठा भाऊ

Web Title: amol khatal jawan missing