...आणि शिर्डीत उडत्या हेलिकॉप्टरमधून उतरले कमांडो

सतीश वैजापूरकर
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

एकाच वेळी दोन्ही बाजूंनी घेरून बंदिस्त ओलिसांची सुटका करीत, लपलेल्या अतिरेक्‍यांना ताब्यात घेतले.

शिर्डी ः राष्ट्रीय सुरक्षा पथकातील (एनएसजी) कमांडोंनी आज भाविकांना ओलिस ठेवून एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेल्या कथित दहशतवाद्याच्या बीमोड करण्याच्या कारवाईची रंगीत तालीम केली. त्याचाच एक भाग म्हणून हेलिकॉप्टरमधून आलेले कमांडो हेलिकॉप्टर उडते ठेवूनच दोरीच्या साह्याने एका हॉटेलच्या छतावर उतरले. त्याच वेळी काही कमांडोंनी थेट हॉटेलच्या दरवाजावर धडक मारली. त्यातील एकाने मशिनगनमधून डमी राउंड फायर करून, आवारात नजरेस पडलेल्या एका खोट्या-खोट्या अतिरेक्‍याला कंठस्नान घातले. 

एकाच वेळी दोन्ही बाजूंनी घेरून बंदिस्त ओलिसांची सुटका करीत, लपलेल्या अतिरेक्‍यांना ताब्यात घेतले. सायंकाळी साडेचार वाजता सुरू झालेले हे "सराव ऑपरेशन' तासाभरात साडेपाच वाजता संपले. 
या सरावास चारच्या सुमारास प्रारंभ झाला. कारमधून आलेल्या कथित अतिरेक्‍यांनी या भागात खोटा-खोटा बॉम्बस्फोट केला. या पंचतारांकित हॉटेलात प्रवेश करून काही जणांना ओलिस ठेवले. 

संदेश मिळताच कमांडो दाखल 
एनएसजी जवानांना संदेश मिळताच काही वेळातच, या हॉटेलच्या छतावर एनएसजी कमांडोंना घेऊन येणारे हेलिकॉप्टर हवेत स्थिरावले. दोरीच्या साह्याने एकापाठोपाठ एक सशस्त्र कमांडो छतावर उतरले. त्यांनी वरच्या मजल्याकडून अतिरेकी लपलेल्या मजल्याकडे जायला सुरवात केली. 

वॉकी-टॉकीवरून सूचना 
या "ऑपरेशन'चा सूत्रधार अधिकारी वॉकी-टॉकीवरून पुढील हालचालींबाबत सूचना देत होता. एवढ्यात हॉटेलच्या मुख्य दरवाजासमोर कमांडोंना घेऊन आलेली एक कार थांबली. त्यातील कमांडो आवेशात घोषणा देत हॉटेलमध्ये शिरत होते. या वेळी त्यांच्या नजरेस पडलेल्या एका कथित अतिरेक्‍याला त्यांनी डमी राउंड फायर करून ठार केले. 

अतिरेक्‍यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर 
एकाच वेळी दोन्ही बाजूंनी घेराबंदी करीत अतिरेक्‍यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत त्यांना जेरबंद केले आणि ओलिसांची सुटका केली. या रंगीत तालमीत "एनएसजी'चे 140 कमांडो, दोन कर्नल, दोन मेजर व तीन कनिष्ठ अधिकाऱ्यांसह बॉम्बशोधक व स्फोटके नष्ट करणारे पथक, श्‍वानपथक व डॉक्‍टरांच्या तुकडीनेही भाग घेतला. 

शिर्डी विमानतळावर आज तालीम 
देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या साईमंदिरावर अतिरेक्‍यांकडून हल्ला होण्याची शक्‍यता गृहीत धरून आजचा हा सराव करण्यात आला. आज रात्री अकरा ते पहाटे तीन या वेळात साईमंदिर व परिसरात, तसेच मंगळवारी (ता. तीन) शिर्डी विमानतळावर अशीच रंगीत तालीम केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... and the commandos descended from a helicopter flying at Shirdi