आंधळी ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी ठोकले टाळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

मलवडी - आंधळी (ता. माण) ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या मनमानी व हेकेखोर वागणुकीला संतापून, तसेच कामातील हलगर्जीपणावर चिडलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून या कामचुकार अधिकाऱ्यावर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.

मलवडी - आंधळी (ता. माण) ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या मनमानी व हेकेखोर वागणुकीला संतापून, तसेच कामातील हलगर्जीपणावर चिडलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून या कामचुकार अधिकाऱ्यावर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी, संजय काळे हे आंधळी येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यावर्षी २६ जानेवारी २०१६ रोजी झालेल्या ग्रामसभेत विविध निर्णय घेण्यात आले होते. गावातील सर्व पडीक घरांचा राडारोडा उचलणे व त्या जागांची साफसफाई करणे, सार्वजनिक पाणीपुरवठा नळ जोडण्यांना नळ बसविणे, सौंदडवस्ती, सातकी, लाटणेवस्ती याठिकाणी अस्तित्वात असलेल्या पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा सुरू करणे, जगताप यांच्या विहिरीतून ग्रामपंचायत पाणीपुरवठा विहिरीत पाणी सोडणे आदी निर्णय घेण्यात आले होते. पुन्हा १५ ऑगस्ट २०१६ रोजीच्या ग्रामसभेत हे सर्व विषय घेण्यात आले. तोपर्यंत एकही काम मार्गी लागले नव्हते. त्यामुळे गटविकास अधिकारी रमेश काळे यांच्या कार्यालयात सहा डिसेंबर रोजी सर्वांची एक बैठक घेण्यात आली. या वेळी ग्रामविकास अधिकारी काळे यांनी १५ डिसेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते; पण आजपर्यंत वरील कामांपैकी एकही काम पूर्ण तर झाले नाहीच; पण मार्गीही लागले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज आंधळी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.

ग्रामविकास अधिकारी संजय काळे हे वारंवार सूचना देऊन, गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठका घेऊनही सामान्य जनतेच्या सार्वजनिक कामांकडे दुर्लक्ष करतात. तेव्हा त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
- दादासाहेब काळे, ग्रामस्थ, आंधळी.

Web Title: andhali grampanchyat lock