मगरीला जलाशयाजवळील वनक्षेत्रात सोडल्याने संताप

मगरीला जलाशयाजवळील वनक्षेत्रात सोडल्याने संताप

केत्तूर (करमाळा - सोलापूर) : अथांग पाणीसाठा झालेल्या उजनी धरणाच्या पाण्यात भीमानगर (ता. माढा) परिसरात सापडलेली महाकाय मगर उजनी जलाशयाजवळील किनारीच वनक्षेत्रात सोडण्यात आल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.


दरम्यान, इंदापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्याशी खूप प्रयत्नांती संपर्क झाला. ते याविषयी म्हणाले, रविवारी सापडलेल्या मगरीवर पुणे येथील पथकाने उपचार केले. त्यांनी ही मगर पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सांगितले. त्यानंतर मगरीला इंदापूर तालुक्‍यातील वनक्षेत्रात नेऊन मुक्त करण्यात आले आहे. मगरीचे संवर्धन व संरक्षण करणे गरजेचे होते. जास्त वेळ तिला बंदिस्त ठेवता येत नव्हते, त्यामुळे कायद्याच्या कक्षेत राहून वरिष्ठांच्या आदेशानुसार मूळ आदिवासात वनक्षेत्रात मगरीला सोडले आहे.


उजनी जलाशयात मगरीचे वास्तव्य आहे, अशी चर्चा व बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या, परंतु प्रत्यक्ष मगर मात्र कोणासही दिसली नव्हती. त्यामुळे ती अफवा ठरली होती. रविवारी (ता. १) भीमानगर (ता. माढा) येथे उजनी धरणाजवळच मच्छीमारांनी १५० किलो वजनाची व १२ फूट लांब मगर धाडसाने पकडून ती वनविभागाच्या ताब्यात दिली होती. जलाशयात धरणाजवळ एवढी मोठी मगर पहिल्यांदा सापडल्याने उजनी जलाशयामध्ये मगरीचे वास्तव्य आहे, हे लक्षात आल्याने मच्छीमारांसह शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी कंदर (ता. करमाळा) येथे मच्छीमारांनी एक मगर पकडून ती वनविभागाच्या ताब्यात दिली होती.


वनविभागाने ही मगर नेमकी कोणत्या ठिकाणी सोडली, हे मात्र गुलदस्त्यातच ठेवले आहे. त्यामुळे इंदापूर, करमाळा तालुक्‍याच्या जलाशय परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com