नगर : बिबट्याच्या तावडीतून वासराला जनावरांनी रिंगण करीत वाचविले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

बिबट्याने दोन वर्षांच्या वासराची मान जबड्यात पकडली होती. वासराला खाली पाडण्याचा प्रयत्न तो करीत होता. कानवडे यांनी दुरूनच आरडाओरडा करून बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला; मात्र हातची (तोंडची) शिकार सोडायला बिबट्या तयार नव्हता.

लिंगदेव (अकोले, नगर) :  सकाळची वेळ. शेतकऱ्याने चरण्यासाठी जनावरे मोकळी सोडली. दबा धरून बसलेल्या बिबट्याने वासरावर हल्ला केला. जवळच चरणाऱ्या अन्य जनावरांनी बिबट्याच्या तावडीतून वासराची सुटका केली; पण शिकार सोडण्यास तयार नसलेला बिबट्या रिकाम्या हाती जाण्यास तयार नव्हता. सर्व जनावरांनी रिंगण करीत वासराला संरक्षण दिले नि अखेर बिबट्याला माघार घ्यावी लागली...

अकोले तालुक्‍यातील लिंगदेव येथे आज सकाळी सातच्या सुमारास हा थरार घडला. तेथील नामदेव कानवडे यांनी गावापासून साधारण चार किलोमीटरवरील डोंगरावर जनावरे ठेवली आहेत. त्यांच्यासाठी तेथे छोटेसे छप्परही केले आहे. कानवडे यांनी आज सकाळी जनावरे चरण्यासाठी डोंगरावर सोडली नि काही वेळातच एका वासराचा ओरडण्याचा केविलवाणा आवाज त्यांच्या कानी पडला. त्यांनी छपरातून बाहेर धाव घेतली तेव्हा समोरचे दृश्‍य पाहून त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला.

बिबट्याने त्यांच्या दोन वर्षांच्या वासराची मान जबड्यात पकडली होती. वासराला खाली पाडण्याचा प्रयत्न तो करीत होता. कानवडे यांनी दुरूनच आरडाओरडा करून बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला; मात्र हातची (तोंडची) शिकार सोडायला बिबट्या तयार नव्हता. बिबट्यापुढे मालकही हतबल झाल्याचे पाहून जवळच चरणारे दोन बैल आणि काही गायी मदतीसाठी धावल्या. त्यांनी बिबट्याला हाकलण्यास सुरवात केली; मात्र तरीही बिबट्या वासराला सोडत नव्हता. अखेर एका बैलाने जोरात धडक दिल्याने बिबट्या दूर पळाला; पण तो तेथून जाण्यास तयार नव्हता. तो पुन्हा हल्ला करण्याच्या पवित्र्यात असल्याचे पाहून जनावरांनी गोल रिंगण करीत जखमी वासराला संरक्षण दिले.

सर्व जनावरे बिबट्याकडे पाहत ठामपणे उभी राहिली. जनावरे माघार घेत नसल्याचे पाहून अखेर बिबट्याने तेथून काढता पाय घेतला.

कानवडे यांनी जवळपासच्या लोकांना बोलावून घेतले. जनावरांनी वासराचे प्राण वाचविल्याचे पाहून कानवडे यांचा ऊर भरून आला होता. वासराच्या गळ्याला, मानेला व पाठी-पोटाला बिबट्याने चावा घेतल्याने व नख्यांच्या ओरखड्यांनी जखमा झाल्या आहेत. उपचारासाठी कानवडे यांनी त्याला गावातील घरच्या गोठ्यात आणले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Animals rescued calf from leopard