पूर्ण वेळ डॉक्‍टरांअभावी पशुपालक सैरभैर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

वडगाव हवेलीचा पशुवैद्यकीय दवाखाना असून अडचण, नसून खोळंबा; शेतकऱ्यांची ससेहोलपट 

रेठरे बुद्रुक - वडगाव हवेली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यास प्रशस्त जागा व इमारत असूनही तेथे पूर्ण वेळ डॉक्‍टर नाहीत. निवासाची सोय असतानाही संबंधित डॉक्‍टर येथे राहात नाहीत. परिणामी सर्व सुविधा असतानाही सहायक कर्मचाऱ्यांच्या जीवावर केवळ बंद इमारतीतून चालणारा दवाखान्याचा कारभार म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा असा झाला आहे. 

वडगाव हवेलीचा पशुवैद्यकीय दवाखाना असून अडचण, नसून खोळंबा; शेतकऱ्यांची ससेहोलपट 

रेठरे बुद्रुक - वडगाव हवेली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यास प्रशस्त जागा व इमारत असूनही तेथे पूर्ण वेळ डॉक्‍टर नाहीत. निवासाची सोय असतानाही संबंधित डॉक्‍टर येथे राहात नाहीत. परिणामी सर्व सुविधा असतानाही सहायक कर्मचाऱ्यांच्या जीवावर केवळ बंद इमारतीतून चालणारा दवाखान्याचा कारभार म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा असा झाला आहे. 

दवाखान्यात गेले तर जबाबदार अधिकारी भेटत नाहीत. त्यांच्याकडे दूरध्वनीद्वारे शेतकऱ्यांनी संपर्क साधल्यास दवाखान्यात जनावरेच येत नसल्याने माझे तेथे काय काम आहे, असे उत्तर ऐकायला मिळते. परिणामी जनावरांच्या तपासणीसाठी खासगी डॉक्‍टरांचा आधार घ्यावा लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गेली अनेक वर्षे चाललेल्या या पद्धतीकडे संबंधित खात्यातील वरिष्ठांचेही दुर्लक्ष होत आहे. २००८ पूर्वी हा दवाखाना गावात होता; परंतु छोटी इमारत व भरवस्तीत कामकाज चालत असल्याने त्यात अडथळे येत होते. त्यासाठी ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींनी स्वतंत्र दवाखान्यास सुमारे ५० लाख रुपयांचा निधी मिळवला. या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ ग्रामपंचायतीच्या १० गुंठे जागेत हा दवाखाना उभारला. दवाखाना शासनाचा राज्यस्तरीय पशुवैद्यकीय श्रेणी- दोनचा आहे. १० गुंठ्यात दवाखान्याची कार्यालयीन इमारत, जनावरांना तपासणीसाठी खोडा, निवारा शेड, पिण्याच्या पाण्याची टाकी, तसेच डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र दोन निवासस्थाने तेथे आहेत. मात्र इमारत बांधल्यापासून तेथे पूर्ण वेळ डॉक्‍टर मिळालेले नाहीत. 

उपलब्ध डॉक्‍टरांकडे अतिरिक्त जबाबदारी असली, तरी त्यांनी किमान एक दिवसाआड तरी दवाखान्यात यावे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना कित्येक दिवस ते दवाखान्याकडे फिरकत नाहीत. दवाखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये वडगाव हवेली, दुशेरे व कोडोली ही गावे आहेत. या तीनही गावांमध्ये पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 

माझ्याकडे बेलवडे हवेली दवाखान्याचा अतिरिक्त कार्यभार आहे. तेथून वडगाव हवेलीपर्यंतचे अंतर जास्त असल्याने मी आठवड्यातून तीन दिवस वडगावमध्ये काम करतो; परंतु कार्यक्षेत्रामधील शेतकरी खासगी प्रशिक्षणार्थींकडून जनावरांना उपचार घेत असल्यामुळे मला तेथे फारसे काम राहत नाही. सध्या तर उन्हाळा असल्याने मला कोणतेही काम नाही. 
- डॉ. एम. पी. कणसे, पशुधन पर्यवेक्षक.

श्रेणीमध्येही गल्लत... 
वडगाव हवेलीस राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ हा दर्जा व पशुधन पर्यवेक्षक वर्ग-३ असे अधिकारी पद आहे; परंतु दवाखान्याबाहेरील फलकावर चक्क पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ असा उल्लेख आहे. यातून संबंधित विभागाचा कारभार दिसत आहे. तेथे डॉक्‍टरांऐवजी सहायक कर्मचारी निवासी असल्याने डॉक्‍टरांना शोधताना शेतकऱ्यांना संबंधित कर्मचाऱ्यांची मनधरणी करावी लागते.

Web Title: animwal owner confuse for full time doctor