मोदींच्या काळातही भ्रष्टाचार- अण्णा हजारे करणार आंदोलन

टीम ई सकाळ
बुधवार, 29 मार्च 2017

लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आंदोलनाची तारीख कळवणार आहे. या आंदोलनासाठी फेसबुक पेजही तयार करण्यात आले आहे. लोकांना हे फेसबुक पेज लाईक करून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन अण्णांनी केले.

अहमदनगर : 'केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येऊन तीन वर्ष झाली तरीही अद्याप भ्रष्टाचार थांबलेला नाही. लोकपालांची नियुक्ती करण्याचीही या सरकारला  इच्छा नाही,' अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. 'लोकांना वाटत आहे की अण्णा हजारे गप्प बसले आहेत, पण आपण गप्प बसलो नाही. आता पुन्हा एकदा आंदोलन करावे लागेल,' असा इशाराही त्यांनी दिला. 

अहमदनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना अण्णा हजारे बोलत होते. भ्रष्टाचार, लोकपाल नियुक्तीच्या मुद्द्यावरून त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. पूर्वीच्या सरकारने लोकपालसंबंधी कायदा केला, परंतु त्याची अंमलबजावणी केली नाही. हा जनतेच्या भावनांचा अपमान आहे. 

लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आंदोलनाची तारीख कळवणार आहे. या आंदोलनासाठी फेसबुक पेजही तयार करण्यात आले आहे. लोकांना हे फेसबुक पेज लाईक करून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन अण्णांनी केले.

सरकारला अडचण काय?
भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्येलोकायुक्त नेमण्यात तरी सरकारला काय अडचण आहे, असा प्रश्न अण्णा हजारे यांनी उपस्थि केला. लोकपाल कायदा व्हावा ही जनतेच्या ‘मन की बात’ होती. लोकपालाची नियुक्ती शक्य नसेल तर निदान राज्यांमध्ये लोकायुक्तांची नियुक्ती केली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  

लोकपालच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला फटकारले होते. तीव्र संघर्षांनंतर लोकपाल कायदा मंजूर करण्यात आला, त्यामुळे विद्यमान सरकारची इच्छा नसली तरी लोकपालांची नियुक्ती केलीच पाहिजे. सरकारने आतापर्यंत यामध्ये सुधारणा का केली नाही? या कायद्याचे आम्ही कलेवर होऊ देणार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले होते.
 

Web Title: anna hazare blames modi govt for failure to curb corruption