मोफत फास्टॅगची घोषणाच... कार्यवाही शून्य !

तानाजी पवार
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

आता एक डिसेंबरपासून सर्व वाहनांसाठी हा टॅग बंधनकारक केला आहे. परंतु हे टॅग मिळत नसल्याने त्याची अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित हाेत आहे.

 वहागाव (जि. सातारा) : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) एक डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्‍यांवर मोटार वाहनांवर फास्टॅगचे स्टिकर लावणे बंधनकारक केले आहे. ते नसेल तर टोलच्या रकमेच्या दुप्पट पैसे वाहनधारकांना मोजावे लागणार आहे. तसा इशारा केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. मात्र, पाच दिवसांनंतरही आज दुपारपर्यंत तासवडे येथील टोल नाक्‍यावर मोफत फास्टॅग उपलब्ध नव्हता. प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याची प्रचिती वाहनधारकांना आली.
 
केंद्र शासनाने दोन नोव्हेंबर 2018 पासून परिवहन वाहनांना फास्टॅग बंधनकारक केला. त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर दरपत्रकामध्ये स्पष्टता नसल्याचा दावा वाहतूकदारांनी केला. त्यामुळे संभ्रम होता. परिणामी, टॅगची अपेक्षित विक्री होत नव्हती. टोल नाके, नोंदणीकृत बॅंका, प्रादेशिक परिवहन कार्यालये, मार्गावरील फूड प्लाझा आदी ठिकाणी टॅग उपलब्ध करून देण्यात आले होते. पण, 200 ते 500 रुपये डिपॉझिट असल्याने तसेच खासगी एजन्सीकडून वाढीव शुल्क घेतले जात असल्याने अनेकांनी त्याकडे पाठ फिरविली. 

अंमलबजावणी शून्य 

आता एक डिसेंबरपासून सर्व वाहनांसाठी हा टॅग बंधनकारक केला आहे. हा टॅग नसल्यास दुप्पट टोल घेतला जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच हा टॅग मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणाही त्यांनी केली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही टोल नाक्‍यांवर होत नसल्याची प्रचिती वाहनधारकांना येत आहे.
 

फास्टॅग लवकरच उपलब्ध करु : एनएचएआय

एनएचएआयचे अधिकारी बशीर भाई म्हणाले, ""फास्टॅग हा ऑनलाइन, ऑफलाइन विनामूल्य उपलब्ध करून दिले जातील. त्याची घोषणा झाली आहे. मात्र, अद्यापही मोफत फास्टॅग उपलब्ध झालेले नाहीत. लवकरच टोलनाके, बॅंकांमध्ये टॅग उपलब्ध असतील. टॅगसाठी संबंधित बॅंक खात्यावर किमान 150 रुपये प्रत्येक वेळी शिल्लक असणे आवश्‍यक आहे. एक डिसेंबरपासून टोल नाक्‍यांवर फास्टॅगसाठी काही लेन करण्यात येतील. फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी एखादी स्वतंत्र लेन ठेवली जाऊ शकते. फास्टॅग लावण्याचे काम दिलेल्या संबंधित यंत्रणेकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. 
 

...असा होईल फास्टॅगचा फायदा 

टोल नाक्‍यांवर शुल्क भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामध्ये वेळ व इंधनही खूप वाया जाते. त्याची बचत करण्यासाठी सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सी टॅगसारखा फास्टॅग काम करतो. वाहनाच्या पुढील बाजूच्या काचेवर एका बाजूला टॅग लावला जातो. हा टॅग प्रवासाच्यावेळी रिचार्ज करणे आवश्‍यक आहे. टोल नाक्‍यावर हे वाहन आल्यानंतर तेथे थांबण्याची गरज पडणार नाही. कॅमेऱ्याद्वारे हा फास्टॅग स्कॅन होऊन त्यातील टोलचे पैसे कापले जातील. त्यामुळे वेळ आणि इंधनाचीही बचत होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Announcement Of Free Fastag ... Implementation Zero !