आरसी बुकमध्ये दोन अधिक एकची नोंदणी नसल्याने मनस्ताप 

अजित झळके 
Thursday, 17 September 2020

मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांच्या आसन क्षमतेची दोन अधिक एकची नोंदी वाहन नोंदणी पुस्तिकेत (आरसी बुक) केली जात नसल्याने वाहनमालकांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

सांगली : मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांच्या आसन क्षमतेची दोन अधिक एकची नोंदी वाहन नोंदणी पुस्तिकेत (आरसी बुक) केली जात नसल्याने वाहनमालकांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. वाहन अपघातानंतर विमा दाव्यात त्याच मुद्यावर तांत्रिक दोष काढून दावा रक्कमेत मोठी कपात केली जात आहे. 

कोल्हापूर येथील एका वाहनाच्या अपघातनंतर विम्यात तब्बल सहा लाखांची कपाती झाली आणि त्यानंतर देश पातळीवर हा विषय चर्चेला आला. केवळ "ऑल इंडिया परमीट' देऊन चालणार नाही तर ते देताना वाहन नोंदणी पुस्तिकेवर आसन क्षमतेत बदल गरजेचे आहे. राज्यात तसे अनेक ठिकाणी झालेले नसल्याने त्यासाठी स्वतंत्र मोहिम राबवण्याची वेळ आल्याचे वाहतूकदार संघटनेचे महेश पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

नेमके काय घडते? 
मालवाहतूकदार नवीन वाहन "चेसिस' स्वरुपात खरेदी करतो. असे चेसिस स्वरुपात मालवाहतूक वाहन खरेदी केल्यानंतर त्याचे सीआरटीएम हे सध्या ऑनलाइन पद्धतीने नोंदवले जाते. वाहन विक्रेते, उत्पादक परिवहन विभागात ते सादर करतात. वाहन उत्पादक "सीआरटीएम'साठी ऑनलाइन अर्ज करतात. विक्री केलेल्या वाहनाचा तपशील परिवहन विभागात सादर करताना वाहनाची आसनक्षमता "एक' अशी दाखवली जाते. त्या चेसिस वरती बॉडी बांधल्यानंतर आसन क्षमता दोन ड्रायव्हर व एक क्‍लीनर इतकी होते. ही नवीन आसन क्षमता वाहनाच्या नोंदणी पुस्तिकेवर दाखल व्हायला पाहिजे. ती होत नाही. 

समस्या इथून सुरु 
वाहनाचा अपघात होत नाही, तोवर या तांत्रिक मुद्याची अडचण येत नाही. अपघात झाल्यानंतर मात्र हा तांत्रिक मुद्या डोकेदुखी ठरतो. मोटर मालक विमा भरपाई सादर करतात. अशावेळी विमा कंपन्यांकडून नोंदणी पुस्तिकेवर आसनक्षमता दोन चालक, एक क्‍लिनर इतकी नसल्याने विमा दावा आणि भरपाईत कपात केली जाते. कोल्हापुरातील नेताजी पवार यांच्या एका 12 टायर ट्रकला सूरतजवळ अपघात झाला. त्याचे पूर्ण नुकसान झाले. त्या गाडीचा वीमा दावा मार्चमध्ये दाखल केला. सर्वे झाला, अहवाल आला. शून्य कपात वीमा होता. त्यांना 25 लाख मिळणे गरजेचे होते. पण, कंपनीने आरसी बुकमध्ये दोष काढला. या अपघातात दोन चालक जखमी झाले होते. त्याचे दवाखान्यातील बील मालकाने भरले. कंपनीने आडदांडपणा केला. दोन अधिक एक नोंदणी करून आणा, असे सांगितले गेले. ते शक्‍य न झाल्याने सहा लाख रुपये कमी भरपाई देण्याचा निर्णय झाला. एका तांत्रिक मुद्याने 25 टक्के फटका बसला. 

यावर उपाय काय ? 
जिल्हा वाहतूकदार संघटनेने वाहन वितरकांच्या माध्यमातून कंपन्यांशी संपर्क साधला आहे. कंपन्यांकडून वाहनाचे कागद जारी केले जातानाच दोन अधिक एक आसन क्षमता नोंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सन 2018 पासून ऑनलाईन प्रक्रिया सुरु आहे. आता चालू नोंदणी पुस्तिकेवर 2 अधिक 1 आसन क्षमता नसेल तर स्थानिक परिवहन विभागात वाहनधारकांनी अर्ज करावा. ऑल इंडिया परमीट नवीन काढताना किंवा नूतनीकरण करताना ती नोंद झाली आहे का, हे तपासून घ्यावे, असे आवाहन वाहतूक संघटनेच्या महेश पाटील यांनी केले आहे. 

ऑल इंडिया परमीट देताना आम्ही दोन अधिक एक अशी नोंद करतोच. विषय फक्त राज्यापुरत्या परवान्याचा असेल तर ती वाहन उत्पादक कंपनीची जबाबदारी आहे आणि हा धोरणाचा विषय आहे. वाहतूकदार संघटनांना केंद्र सरकारकडे प्रयत्न करून 2 अधिक एकला मान्यता आणली तर धोरणानुसार तशा नोंदी करणे शक्‍य होईल. 
- विलास कांबळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Annoyance if two plus one is not registered in RC Book