सोलापूर महापालिका शोधणार अपार्टमेंटमधील पाणीचोर

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 25 जुलै 2018

सोलापूर - शहर व हद्दवाढ भागात असलेल्या अपार्टमेंटमधील पाणीचोर शोधण्याचे आदेश आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत. अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नियुक्त करण्यात येणार आहे. त्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन तपासणी करण्याची सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. 

सोलापूर - शहर व हद्दवाढ भागात असलेल्या अपार्टमेंटमधील पाणीचोर शोधण्याचे आदेश आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत. अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नियुक्त करण्यात येणार आहे. त्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन तपासणी करण्याची सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. 

अनधिकृत नळजोड घेऊन पाणी चोरणाऱ्यांसाठी महापालिकेने 15 ऑगस्टपर्यंत अंतिम अभय योजना जाहीर केली आहे. 10 हजार रुपये भरा आणि अनधिकृत नळजोड नियमित करून घ्या, असे या योजनेचे स्वरूप आहे. योजना जाहीर करून महिना उलटला. मिळकतदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता अपार्टमेंट आणि मोठ्या इमारतींची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

सोलापूर शहरात हजारोंच्या संख्येने अनधिकृत नळजोड असल्याचा आरोप वारंवार होतो. त्यात तथ्यही असल्याचे अनेकवेळा आढळून आले आहे. तत्कालीन आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी अशा पाणीचोरांविरुद्ध मोहीम राबविली. त्यांनी पहिला हातोडा उजनी ते सोलापूर मुख्य जलवाहिनीतून पाणी चोरणाऱ्यांवर हाणला. धक्कादायक म्हणजे सार्वजनिक क्षेत्रात मान्यवर म्हणून वावरणारे मोहोळ परिसरातील अनेक प्रतिष्ठित पाणीचोर निघाले होते. याप्रकरणी काही जणांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. 

जलवाहिनीवरील मोहीम संपल्यानंतर श्री. काळम-पाटील यांनी शहरातील पाणीचोरांविरुद्ध मोहीम राबविली. 21 ते 30 ऑगस्ट 2015 या कालावधीत आठ विभागीय कार्यालयांतर्गत राबविलेल्या या मोहिमेत 465 पाणीचोर आढळले. त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात आले. ही बाब अद्यापही न्यायप्रविष्ट आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने मध्यंतरी सर्वेक्षण केल्यावर शहराच्या अनेक भागांत अजूनही अनधिकृत नळजोड असल्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर हे नळजोड नियमित करण्यासाठी 15 ऑगस्ट 2018 मुदत देण्यात आली आहे. नळजोड नियमित करण्यासाठी रीतसर अर्ज, अनामत, मीटर चार्ज व कोटेशन मिळून 10 हजार रुपये दंड आणि नळजोड घेतलेल्या दिवसांपासूनची पाणीपट्टी भरून नळजोड नियमित करता येतील. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांविरुद्ध कोणतीही पोलिस कारवाई केली जाणार नाही. मात्र, 15 ऑगस्टनंतर जे शोध मोहिमेत आढळतील त्यांच्याविरुद्ध पोलिस कारवाई केली जाणार आहे. 

असा आहे संशय 
शहरातील काही अपार्टमेंटमध्ये एक किंवा दोन नळजोड घेऊन, उर्वरित रहिवाशांना उपजोड दिले गेले आहे. महापालिकेस बिल मात्र एक किंवा दोनच नळजोडाचे मिळते, पाणी मात्र अपार्टमेंटमधील सर्वच रहिवासी वापरतात. तपासणीच्यावेळी प्रत्येकाकडे पाणीपट्टीची बिले असणे अपेक्षित आहे, अन्यथा ते बेकायदेशीरपणे पाणी घेत आहेत, अशी नोंदणी केली जाणार आहे.

Web Title: apartment water theft searching by municipal