अपशिंगेच्या शाळेस लाभला आंतरराष्ट्रीय दर्जा

school
school

नागठाणे - सैनिकांचे गाव म्हणून ख्याती पावलेल्या अपशिंगे (मिलिटरी, ता. सातारा) येथील प्राथमिक शाळेचेही नाव आता सर्वदूर पोचणार आहे. या शाळेस आंतरराष्ट्रीय दर्जा लाभला आहे. ही कामगिरी जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राला झळाळी देणारी ठरणार आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या १०० शाळा निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या अनुषंगाने आवश्यक ते निकष पूर्ण करत अपशिंगेतील शाळेने मोठी झेप घेतली आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जामुळे इथल्या शिक्षण पद्धतीत येत्या शैक्षणिक वर्षापासून आमुलाग्र बदल करण्यात येणार आहेत. हा अभ्यासक्रम बालवर्ग ते तिसरी इयत्तेपर्यंत शिकविला जाणार आहे. शाळेत आंतरराष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकही उपलब्ध होणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणे शक्य होणार आहे. शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, विस्तार अधिकारी जयश्री गुरव, केंद्रप्रमुख रामचंद्र गायकवाड यांनी शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ग्रामस्थांनीही या सर्वांची आज मिरवणूक काढत गौरव केला.

थक्क करणारी यशोगाथा 
अपशिंगेतील शाळेची स्थापना 1903 मधली. इथली इमारत ब्रिटिशकालीन. सध्या तीनशे विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेने गेल्या पाच वर्षांत सुमारे 50 लाख रूपयांचा शैक्षणिक उठाव केला आहे. शाळा व्यवस्थापन समितीने 60 विद्यार्थ्यांची सहल थेट विमानाने बंगळूरला नेली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com