इथे ऊनही येते दबकत...दबकत!

nature
nature

कोल्हापूर : मलकापूर ते उदगिरी अंतर 27 किलोमीटरचे. त्यातले नऊ किलोमीटर अंतर घनदाट जंगलाचे. किर्र अशा अर्थाने की, प्रखर उन्हालाही या जंगलात दबकत... दबकत उतरावे लागते. दिवस मावळत आला की, गव्यांचे कळप दिसू लागतात. बिबट्या समोर दिसला तर तो क्षणात वेगळा; पण रस्त्यावरच्या मऊ लालसर मातीत निरखून पाहिले तरी बिबट्याच्या पावलाचे ठसे दिसतातच. जंगलातल्या या रस्त्यावर पायी चालत जाणारा माणूस दिसतच नाही. किमती गाड्या मात्र अधूनमधून दिसतात. बहुतेक मुंबई, कऱ्हाड, सातारा पासिंग असतात. कारण या जंगलातून पुढे उदगिरी गावाजवळच्या महाकाली, सरस्वती काळम्मा या देवीचे हे सारे भाविक असतात. 

हे जंगल पार केले की, अचानक समोर मोकळा तिठ्ठा लागतो. आणि या तिठ्ठयावर झाडाच्या पानांनी झाकलेली एक छोटी चहाची खोपी दिसते. एवढ्या निर्मनुष्य परिसरात ही एक खोपी कशी काय? हे वाटत असतानाच खोपी शेजारी एक उभा दगड, त्यावर एक पांढरे कापड आणि गुलालाची शिंपण दिसते. हा उदगिरीच्या जंगल परिसरातील "उभा देव' आणि बरोबरच त्याच्या समोरून पुन्हा एक खाचखळग्याने भरलेला रस्ता काळम्मा, महाकालीच्या दिशेने जातो. 

उदगिरीच्या जंगलातला हा रस्ता म्हणजेच एक आगळ्यावेगळ्या पर्यटनाची संधी. मलकापूर, निळे फाटा ते उदगिरीचा हा रस्ता निसर्गरम्य. सुरुवातीला भेंडवडे गावाजवळ मोठा जलाशय आणि त्यानंतर जलाशयाच्या काठाकाठाने रस्ता सुरू होतो आणि आठ-दहा किलोमीटर नंतर थेट दाट झाडीतच जाऊन भिडतो. रस्ता जंगलातला असला तरी काही अंतरावर उदगिरी हे गाव आणि काळम्मा, महाकालीचे प्राचीन मंदिर. त्यामुळे हा रस्ता लोकांना बंद करता येत नाही. काही वर्षापूर्वी याच रस्त्यावरून बॉक्‍साईटची वाहतूक होत होती. त्यामुळे गर्द जंगलातल्या या रस्त्यावर बॉक्‍साईटच्या ट्रकची सतत धडधड होती. आता बॉक्‍साईटची खोदाई बंद आहे. त्यामुळे ट्रकची धडधड बंद आहे. वन्यजीवांना खूप शांतता मिळाली आहे आणि त्यामुळे या रस्त्यावर त्यांचा वावर अगदी खुला आहे. 

एवढ्या दाट जंगलातून आत असलेल्या या मंदिरात भाविकांची गर्दी पाहून अचंबित व्हायला होते. यातला श्रद्धेचा भाग वेगळा; पण या देवाच्या निमित्ताने लोक जंगल अनुभवतात. जंगलातली निरव शांतता अनुवभतात. आणि दिवस मावळतीला परतणारे लोक तर गव्यांचे कळपच्या कळप अगदी जवळून पाहतात. उदगिरी हे कोल्हापूर जिल्ह्याचे पश्‍चिमेचे टोक आहे. चांदोली व्याघ्र प्रकल्पाला लागून किंवा त्याच्या लगतचा हा भाग आहे. खूप वनवैभवाने हा परिसर वेढला आहे. जंगल पर्यटन, धार्मिक पर्यटन या दोन्ही अंगाने त्याचा विकास शक्‍य आहे. 

पुजारी सांगतील ती आराधना 
परिसरातल्या काळम्मा, महाकाली, सरस्वतीचे मंदिर व त्याची उपासना "कडक' मानली जाते. त्यामुळे भाविकांत खूप जागरूकता असते. पुजारी सांगतील ती आराधना या जंगलातील मंदिरात सुरू असते. ही आराधनाही कडक असते. विशेष हे की, मुंबई, कऱ्हाड, सातारा परिसरातून आलेल्या भाविकांची संख्या मोठी असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com