उपनगरांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

सातारा - कृष्णा नदी उद्‌भवातून रोज २० दशलक्ष लिटर पाणीउपसा होत असतानाही साताऱ्याच्या उपनगरांतील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईस तोंड द्यावे लागत आहे. पाण्याचे असमान वाटप, मुख्य दाबनलिकेवरील (रायझिंग लाईन) जोडण्या, जलवाहिन्यांच्या गळतीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे ही कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे.

सातारा - कृष्णा नदी उद्‌भवातून रोज २० दशलक्ष लिटर पाणीउपसा होत असतानाही साताऱ्याच्या उपनगरांतील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईस तोंड द्यावे लागत आहे. पाण्याचे असमान वाटप, मुख्य दाबनलिकेवरील (रायझिंग लाईन) जोडण्या, जलवाहिन्यांच्या गळतीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे ही कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे.

सातारा शहराच्या पूर्वेकडील सदरबझार, गोडोली व करंजेचा काही भाग, तसेच शाहूपुरी, शाहूनगर, खिंडवाडी, विलासपूर, संभाजीनगर, विसावा नाका, खेडचा काही भाग, कृष्णानगर या भागाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. कृष्णा नदी उद्‌भवातून प्राधिकरण पाणीउपसा करून शुद्ध केलेले पाणी सुमारे पावणेदोन लाख लोकसंख्येला पुरविले जाते. उन्हाच्या झळा लागायला लागल्यापासून शाहूपुरीत पाण्याची अडचण आहे. आठ-आठ दिवस शेजाऱ्यांच्या बोअरचे पाणी आणून, खर्चासाठी टॅंकर आणून गरज भागविण्याची सवयच शाहूपुरीवासीयांना जडली आहे. गेल्या आठवड्यात सदरबझारमध्ये गणेश कॉलनी व परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले होते. शाहूनगरमध्येही कमी दाबाने व अल्पकाळ पाणी मिळत असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत. 

शासनाच्या निकषानुसार प्रति माणसी १३५ लिटर पाणी पुरवणे आवश्‍यक आहे. साताऱ्यात कसेबसे १०० लिटर प्रति माणसी पाणी पुरवताना प्राधिकरणाची दमछाक होते. पावसाळा व हिवाळ्याच्या दिवसांत पाण्याची गरज कमी असल्याने पाण्याची चणचण भासत नाही. तथापि, उन्हाळ्यात पाण्याची गरज व मागणी वाढते. ही वाढीव गरज भागविताना प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडते. परिणामी आंदोलनांना सामोरे जावे लागते. एका ठिकाणावरून पाणी उपसून दुसऱ्या टाकीत चढवले 
जाते. 

या दोन टाक्‍यांना जोडणाऱ्या जलवाहिनीस दाबनलिका म्हणतात. या दाबनलिकेवरून वाटेतील काही भागास पाण्याची कनेक्‍शन देण्याचे पाप यापूर्वीच्या प्राधिकरणाच्या काही मंडळींनी केले. त्याचे दृष्परिणाम आज प्राधिकरणाच्या अंतर्गत असणाऱ्या भागांना सहन करावे लागत आहेत. दाबनलिकेतील पाण्याचा प्रचंड दाब असतो. तसेच १८ ते २० तास या नलिका प्रवाही असतात. त्यामुळे ऋतू कोणताही असला तरी त्यावरून कनेक्‍शन घेतलेल्या भागात पाण्याचा सुकाळ असतो. सातारा व परिसरातील काही भागातील नागरिक या सुकाळाचा आनंद घेत आहेत. तर दुसऱ्या बाजूस मोठ्या लोकसंख्येच्या वस्त्या व उपनगरांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. शाहूपुरी, शाहूनगरमध्ये जलवाहिन्यांच्या गळत्यांची संख्या मोठी आहे. या गळत्या काढून पाणी वाचविण्यापेक्षा अपार्टमेंटना सोईप्रमाणे कनेक्‍शन देण्याकडे कर्मचाऱ्यांचा ‘कल’ दिसतो. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे समान वाटप होत नाही. 

Web Title: Artificial water shortage