वर्षभरापासून मिळेना कलाकारांना मानधन! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

पुसेसावळी - सरकारकडून दर महिन्याला कलाकारांना मिळणारे मानधन (पेन्शन) काही कलाकारांना गेल्या वर्षभरापासून मिळालेली नसल्याने वयोवृद्ध कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

पुसेसावळी - सरकारकडून दर महिन्याला कलाकारांना मिळणारे मानधन (पेन्शन) काही कलाकारांना गेल्या वर्षभरापासून मिळालेली नसल्याने वयोवृद्ध कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

आध्यात्मिक, सांस्कृतिक, कला क्षेत्रामधील साठ वर्षे पूर्ण असलेल्या कलाकारांना सरकारकडून महिन्याला एक हजार मानधन मिळते. वयाची साठी ओलांडलेल्या अशा कलाकारांना सरकारने मानधनाच्या माध्यमातून मदतीचा हात दिल्याने अनेकांचे जीवन सुखदायक झालेले आहे. त्यामधून त्यांचा चरितार्थ चालवण्यात मदत होते. मात्र, गेल्या वर्षभरात महिन्याला मिळणारे मानधन बंद झाल्याने या कलाकारांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसत आहेत. कलाकार मात्र, तालुक्‍याच्या मुख्यालयात संबंधित विभागात चकरा मारूनही याबाबत ठोस उपाययोजना न झाल्याने वयाच्या सत्तरीत अनेक कलाकारांवर कष्ट करण्याची वेळ आली आहे. काहींना चालता, फिरताही येत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने कलाकारांचे मानधन पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी होत आहे. 

याबाबत बोलताना वडगाव येथील भजन कलाकार रामचंद्र घार्गे म्हणाले, ""गेल्या वर्षभरापासून कलाकार म्हणून मिळणारे मानधन बंद झाले आहे. तालुकास्तरावर संबंधित विभागात अनेक हेलपाटे झाले पण अजूनही त्यावर ठोस उत्तर मिळाले नाही. सरकारने ज्येष्ठ कलाकारांची चेष्टा लावली आहे की काय कळत नाही? याबाबत सरकारने त्वरित निर्णय घ्यावा व आम्हाला मिळणारे मानधन पूर्ववत सुरू करावे.'' 

"ऑनलाइन'साठी कागदपत्रांची पूर्तता करा 

दरम्यान, हे मानधन सप्टेंबर 2016 पासून ऑनलाइन अदा करण्याचा प्रारंभ केला असल्याने ज्यांच्या बॅंक पासबुक वगैरे त्रुटी असतील त्यांचे मानधन मिळालेले नाही. ज्यांची पूर्तता झाली आहे, त्यांना मानधन मिळू लागले आहे. ज्यांनी अद्यापही ऑनलाइन मानधनासाठी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता केली नाही, त्यांनी ती त्वरित करून घ्यावी म्हणजे मानधन बॅंक खात्यावर जमा होईल, असे समाजकल्याण विभागातून सांगण्यात आले.

Web Title: Artist No payment from year