आशा, गटप्रवर्तक महिलांच्या मागण्या जिल्हा परिषदेत मान्य 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

आशा वर्कर्स युनियनच्यावतीने दोन जुलै रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी सयुक्त बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी बैठक झाली. 

सांगली : जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मागण्याबाबत जिल्हा परिषदेत झालेल्या संयुक्त बैठकीत काही मागण्या मान्य करण्यात आल्या. उर्वरीत मागण्यासाठी 18 जुलै रोजी नागपूर अधिवेशनावर आशांचा मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती आयटक आशा वर्कर्स युनियनचे शंकर पुजारी व सुमन पुजारी यांनी दिली. 

आशा वर्कर्स युनियनच्यावतीने दोन जुलै रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी सयुक्त बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी बैठक झाली. 

आशाना एका मिटिंग साठीचे फक्त 150 रुपये दिले जाते. प्रत्यक्षात आशाना एका महिन्यात सक्तीने चार-चार मिटींगसाठी बोलावून मोबदला दिला जात नाही असे श्री. पुजारी यांनी सांगितले. तेव्हा श्री. राऊत यानी महिन्यातून चारवेळा मिटिंग घेता येणार नाहीत असे प्राथमिक आरोग्य केंद्रास कळवले जाईल असे सांगितले. महिला प्रसूतीच्या वेळेस दवाखान्यात आल्यानंतर आशांना थांबवून ठेवले जाणार नाही. कुटुंब नियोजन शत्रक्रिया मोबदला यापुढे आशांना देण्यात येइल. ग्रामीण जनतेला औषधे देण्यासाठी आशांकडे औषधे देण्यात येतील. गटप्रवर्तक महिलाना आरोग्य केंद्रात टेबल खुर्ची देण्यात येईल. बी.एफ. महिलाना कामासाठी वेळ निश्‍चित करून संगणक पुरविण्यात येईल. स्वच्छता अभियानमध्ये फक्त आशानाच स्वच्छता काम सांगितले जाणार नाही. अर्धवेळ परिचारीका महिलाना दररोज फक्त चार तास काम देण्यात येइल असे निर्णय घेतले. 

बैठकीस प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी भूपाल गिरीगोसावी, डॉ. विनायक पाटील, सतीश लवटे, युनियनचे अंजली पाटील, वनिता हिप्परकर, शकुंतला परसे, स्मिता खांडे, विजय बचाटे, विद्या कांबळे, उर्मिला पाटील आदी उपस्थित होते. 

अधिवेशनावर मोर्चा
आशाना दरमहा 18 हजार रुपये मिळाले पाहिजे यासाठी पावसाळी अधिवेशनावर 18 जुलै रोजी धडक मोर्चा काढण्यात येईल असेही श्री. पुजारी यांनी सांगितले.

Web Title: asha workers union in Sangli