
राहुरी : तालुक्यात विविध ठिकाणी मोटारसायकली चोरुन मालकाकडे पैशांची मागणी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश केला. एका आरोपीला सापळा रचून बारागाव नांदूर शिवरात अटक केली. त्याचे दोन साथीदार पसार आहेत. त्याने तेरा मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. पैकी आठ मोटरसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या. मुळा धरणाच्या पाण्यात तीन मोटारसायकली टाकल्याचे आरोपीने सांगितले, अशी माहिती श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांनी दिली.
राहुरी पोलिस ठाण्यात पत्रकार परिषदेत पोलिस उपअधीक्षक मदने बोलत होते. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक निरीक्षक सचिन बागुल उपस्थित होते. मदने म्हणाले, आकाश आहेर (वय 20, रा. डिग्रस) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला, आज बुधवारी (ता. 18) राहुरी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस चौकशीत आरोपीने गणेश शेटे व सनी बाचकर या साथीदारांची नावे सांगितली. बाचकर याला राहुरी पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात यापूर्वी अटक केली होती. सध्या तो जामिनावर सुटलेला आहे. राहुरी शहरात, वांबोरी, व सडे येथे मोटारसायकली चोरल्याची कबुली आरोपीने दिली.
राहुरी पोलिस ठाण्यात मोटरसायकल चोरीची फिर्याद दिलेल्या व्यक्तीला आरोपीने पैशांची मागणी केली होती. खबऱ्याने पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना आरोपीची माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागुल, यशवंत राक्षे, उपनिरीक्षक गणेश शेळके, कॉन्स्टेबल संजय पठारे, सचिन ताजणे, आजिनाथ पाखरे, प्रवीण अहिरे यांच्या पथकाने बारागाव नांदूर शिवारात आरोपीला पकडण्यासाठी सापळा लावला. त्यात आरोपी अलगद अडकला. त्याने, तेरा मोटारसायकली चोरीची कबुली दिली. पैकी आठ मोटारसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या. मुळा धरणात खोलवर पाण्यात तीन मोटारसायकली टाकल्याची कबुली आरोपींनी दिली. त्याच्या पसार साथीदारांचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे राहुरी तालुक्यातील मोटरसायकल चोरांची मोठी टोळी उघडकीस आली आहे.
नागरिकांनी मोटरसायकलची चोरी झाल्यानंतर तात्काळ पोलिस ठाण्यात कळवावे. त्यांना पैशांची मागणी झाल्यास, त्याची माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक मदने यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.