लाचेची रक्कम कमी करण्यास नकार! पहिला हप्ता म्हणून घेतले..

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

पंचासमोर सहायक अभियंता साखरे याने लाचेची रक्कम कमी करण्यास नकार दिला. सोमवारी सायंकाळी गुरुनानक चौकातील जलसंधारण विभागात सापळा लावण्यात आला.

सोलापूर : ऑनलाइन निविदा पद्धतीने घेतलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी आणि उर्वरित कामाची वर्क ऑर्डर देण्यासाठी 7 लाख 50 हजारांच्या लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून 50 हजार रुपये स्वीकारणाऱ्या मृदा व जलसंधारण उपविभागातील सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. विश्‍वजित वसंत साखरे (वय 32, रा. साखरेवाडी, ता. उत्तर सोलापूर) असे अटक केलेल्या सहायक अभियंत्याचे नाव आहे. 

हेही वाचा - 'मिडल ईस्ट'ला जाताहेत सोलापूरचे मासे!

लाचेची रक्कम कमी करण्यास नकार
या प्रकरणात ठेकेदार असलेल्या तरुणाने मृदा व जलसंधारण विभागाचे बंधारा बांधकाम व नाला रुंदीकरणाचे काम ऑनलाइन निविदा पद्धतीने घेतले होते. त्या कामाचे बिल काढण्यासाठी तसेच उर्वरित कामाची वर्क ऑर्डर देवून त्याचे बिल काढून देण्यासाठी मृदा व जलसंधारण उपविभागातील सहाय्यक अभियंता विश्‍वजित वसंत साखरे याने 7 लाख 50 हजारांची लाच मागितली. याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे पडताळणी केली. पंचासमोर सहायक अभियंता साखरे याने लाचेची रक्कम कमी करण्यास नकार दिला. सोमवारी सायंकाळी गुरुनानक चौकातील जलसंधारण विभागात सापळा लावण्यात आला. लाचेचा पहिला हप्ता म्हणून 50 हजार रुपये स्वीकारताना सहायक अभियंता साखरे यास सोमवारी सायंकाळी रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या प्रकरणात सहायक अभियंता साखरेवर सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा - सावंत सेनेला मातोश्रीचा दणका; निष्ठावंतांकडे जबाबदारी

या पथकाची कारवाई
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त संजीव पाटील, पोलिस निरीक्षक जगदीश भोपळे, सहायक फौजदार श्रीरंग सोलनकर, नीलकंठ जाधवर, 
कर्मचारी प्रफुल्ल जानराव, सिद्धाराम देशमुख, संतोष वाघमारे, श्‍याम सुरवसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

हेही वाचा - रेल्वे रुळाजवळ सापडला स्वंयसेवकाचा मृतदेह

लाचेची मागणी केल्यास..
कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याने त्याचे काम करण्यासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी रंगभवन चौक परिसरातील अँटी करप्शन ब्युरो, सोलापूरच्या कार्यालयात तक्रार करावी. अधिक माहितीसाठी 0217-312668, टोल फ्री क्रमांक 1064 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assistant engineer arrested for taking bribe