कोठडीतील आरोपीचा गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न

संजय आ.काटे
गुरुवार, 5 जुलै 2018

सराईत गुन्हेगार शाहरुख अरकास काळे (वय २१) राहणार रांजणगाव मशिदी ता. पारनेर याने कोठडीतील गजांना अंगातील बनियनची दोरी करुन ती अडकवित गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न गुरुवारी पहाटे केला. पोलिसांच्या दक्षतेने अनर्थ टळला. त्याच्याविरुध्द आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 

श्रीगोंदे (नगर) : सराईत गुन्हेगार शाहरुख अरकास काळे (वय २१) राहणार रांजणगाव मशिदी ता. पारनेर याने कोठडीतील गजांना अंगातील बनियनची दोरी करुन ती अडकवित गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न गुरुवारी पहाटे केला. पोलिसांच्या दक्षतेने अनर्थ टळला. त्याच्याविरुध्द आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 

शाहरुख काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द चोरी, घरफोडी, दरोडा टाकण्याची तयारी असे नऊ गुन्हे दाखल आहेत. मांडवगण, श्रीगोंदे शहर, लोणी व्यंकनाथ, घोगरगाव, हिरडगाव या ठिकाणी त्याने सहकाऱ्यांच्या मदतीने तेरा लाखाचा मुद्देमाल लूटताना काही लोकांना जखमी केल्याप्रकरणी तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. 

गुरुवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. अंगातील बनियन फाडून त्याची दोरी केली. ती दोरी कोठडीच्या गजांना अडकवित त्यात गळा घालून फाशी घेण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी कोठडीतील एक आरोपी जागा झाला मात्र त्याने त्यास थांबविले नाही. त्याचवेळी दुसऱ्या एक आरोपी ओरडला आणि पहाऱ्यावर असणाऱ्या पोलिसांनी तातडीने काळे याला गळफास घेण्यापासून बाजुला केले. आपणाला आता जामीन होणार नसल्याने जगण्यात काहीच अर्थ नाही म्हणून आत्महत्या करतोय असे तो सारखे ओरडत होता. 

ही घटना समजतास पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी ठाण्यात येत वस्तुस्थिती तपासली. हा सगळा प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी काळे याच्याविरुध्द आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद पोलिस कर्मचारी रमाकांत परीट यांनी दिल्याने अजून एका गुन्ह्याची काळे याच्याविरुध्द नोंद झाली.

Web Title: attemp to suicide in jail